तणावमुक्त ट्रेडिंग

>> कौस्तुभ खोरवाल, प्राध्यापक आणि गुंतवणूक तज्ञ

एखाद्या कंपनीचा शेअर काही दिवसांपूर्वी मौल्यवान वाटत असतो; पण त्याच कंपनीचा शेअर विकत घेतल्यानंतर हळहळ / दुःख वाटते. कारण शेअरचा भाव खरेदी केलेल्या किमतीच्या खाली ट्रेड (खरीद-विक्री) होताना पाहतो. या मानसिक तणावाला तोंड देण्याचे उपायदेखील आजच्या लेखात दिले आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करताना तोटा झाल्यास हळहळ व्यक्त करू नये. कारण शेअर बाजारातील उतार-चढाव पाहिल्याशिवाय कोणीही शेअर्समधील गुंतवणुकीतील बारकावे शिकू शकत नाही. शेअर बाजारातील अनेक तज्ञ मंडळींच्या तोंडून एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते…शेअर गुंतवणुकीत (किंवा ट्रेडिंगमध्ये) झालेले नुकसान हे नुकसान नसते. ते गमावलेले पैसे शेअरमधील गुंतवणूक कला शिकण्यासाठी दिलेले शुल्क (फी) असते.

आज लेखाच्या सुरुवातीला शेअरमधील नुकसानीबाबत बोलणे सुरू केले. कारण सध्या शेअर बाजारात तात्पुरती घसरण दिसत आहे. अशा प्रसंगी ‘खेद वाटण्याचा सिद्धांत’ जाणून घेतल्यास शेअरमधील गुंतवणूक व्यक्तीच्या मनात अस्थिरता निर्माण करणार नाही.

रिग्रेट थेअरी

शेअर बाजारात असा कोणीही गुंतवणूकदार नाही; ज्याने फक्त नफा कमविला. असे कोणी सांगत असल्यास तुम्ही वैचारिक दृष्टीने सक्षम असले पाहिजे. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता योग्य कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यास अनेक प्रकारे आर्थिक लाभ होत असतो. त्यातील मुख्य लाभ शेअर मूल्य वाढीने अनुभवास येतो, पण आपण शेअर विकत घेतल्यावर लगेच शेअर किमतीत वाढ होत नसते. बहुतांश गुंतवणूकदारांचा अनुभव आहे की, शेअर्स विकत घेतल्यावर भाव कमी होऊ लागतो आणि शेअर्स विकल्यावर आपण विक्री केलेल्या किमतीच्या पुढे शेअरचा भाव जातो. ही खंत कोणालाही चुकलेली नाही.

ट्रेडिंग करत असणाऱया व्यक्ती या अनुभवातून अनेकदा जातात. तुम्ही पहिल्याच वेळी किंवा काही महिन्यांपासून शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्यास अशा प्रसंगांना तोंड देताना दुःखी होऊ नये. शेअर बाजार म्हणजे अस्थिर बाजार, जो एकाच ठिकाणी थांबून राहत नाही. आज बाजारात तेजी असल्यास भविष्यात (तात्पुरती) मंदी येणारच आहे. ही सर्व क्रिया शेअर्समधील खरेदी आणि विक्रीवर अवलंबून असते.

आपल्याला शेअर किमतीतील अस्थिरता मनात खेद निर्माण करत असल्यास खालील मार्गदर्शकपर मुद्दय़ांचा अवलंब करावा.

1) योग्य कंपनीचे शेअर्स दीर्घकाळासाठी विकत घेतल्यावर सतत (दर दिवशी) शेअर भाव पाहत रहायचे नाही.
2) विकत घेतलेल्या शेअर्सचे भाव अचानक वाढल्यास किंवा भाव अचानक पडल्यास घाबरून जाऊ नये.
3) आपण विकत घेतलेल्या कंपनीच्या शेअर्सबद्दलची (विनाकारण) चर्चा इतरांशी करत बसू नये.
4) प्रगत देशांतील शेअर बाजारात होणारी घसरण आपल्या शेअर बाजारावर परिणाम करत असल्यास शेअर किमतीतील घसरण तात्पुरती समजावी. म्हणजेच मानसिक दडपण आल्याने शेअर्स लगेच विकू नयेत.
5) आपण ठरवलेल्या किमतीत शेअर्स विकल्यावर शेअरमधील भाववाढ पाहत बसू नये. कारण इतर अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याची संधी येतच असते.

थोडक्यात, हा सिद्धांत स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचे शिकवितो. ज्या कंपनीचा व्यवसाय उत्तम चालला आहे; त्या कंपनीचा शेअर भाव भविष्यात वाढणारच आहे. आपल्या मनात एक विचार नेहमी पक्का ठेवावा; चांगल्या कंपनीच्या शेअर किमतीत तात्पुरत्या स्वरूपात निर्माण होणारी घसरण दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱया गुंतवणूकदारास शेअर खरेदीची संधी देत असते.