सिनेविश्व – घोषणा तर झाली, पण मधुबाला कोण?

>> दिलीप ठाकूर

चरित्रपट हे फारच मोठे गुंतागुंतीचे आव्हान असते आणि त्यातही चित्रपट कलाकाराच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट असेल तर रसिकांच्या अपेक्षा फारच वाढतात. संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारित दिग्दर्शक राजकुमार हिरानी याने ‘संजू’साठी रणबीर कपूरची निवड केली तेव्हा भुवया उंचावल्या होत्या. पण रणबीर कपूरने पहिल्याच फ्रेमपासून त्याला  न्याय दिला आणि समीक्षक व प्रेक्षकांना जिंकले. दक्षिणेकडील वादग्रस्त अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावरील मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘डर्टी पिक्चर’साठी विद्या बालनने वजन वाढवले. भडक मेकअप केला, पण सिल्क स्मिताची भेदक नजर ती आणू शकली नाही.

मधुबालाच्या आयुष्यावर त्याच नावाचा चरित्रपट निर्माण करण्याची अधिकृत घोषणा झाल्यावर सर्वात पहिला प्रश्न पडला, मधुबाला साकारणार कोण? सोनी पिक्चर इंटरनॅशनल ब्रेविंग थॉटस प्रायव्हेट लिमिटेड, मधुबाला वेंचर्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के. रीन करणार आहेत. आलिया भट्टची भूमिका असलेल्या ‘डार्लिंग’चे दिग्दर्शन जसमीत के. रीनचे होते. ‘मधुबाला’ची निर्मिती तिची बहीण मधुर ब्रिजभूषण व अरविंद कुमार मालवीय करीत आहेत. पण मधुबाला कोण साकारणार हे अद्याप निश्चित नाही.

काही व्यक्तिमत्त्वे एकदाच जन्माला येतात आणि रसिकांच्या पिढय़ा ओलांडूनही आपला प्रभाव कायम ठेवतात. खानदानी सौंदर्यवती मधुबालाचे आयुष्य अवघ्या 36 वर्षांचे. 14 फेब्रुवारी 1933 चा जन्म ते 23 फेब्रुवारी 1969 रोजी दुर्दैवाने कर्करोगाने मृत्यू. रूपेरी पडद्यावर तिची वाटचाल बालकलाकार म्हणून सुरू झाली. बॉम्बे टॉकिजच्या ‘बसंत’ ( 1942) मध्ये उल्हास व मुमताज शांती यांच्या छोटय़ा मुलीच्या भूमिकेत ती बेबी मुमताज नावाने सर्वप्रथम पडद्यावर आली. केदार शर्मा दिग्दर्शित ‘नीलकमल’मध्ये ती राज कपूरची नायिका झाली. तेव्हा त्याचे वय 23, तर मधुबालाचे वय 14 वर्षांचे होते. कमाल अमरोही दिग्दर्शित ‘महल’पासून तिच्या सौंदर्य व अभिनयाची कमाल दिसली आणि ती स्टार झाली.

विशेष उल्लेखनीय गोष्ट, देव आनंदसोबत तिने ‘मधुबाला’ नावाच्या चित्रपटात भूमिका साकारलीय. सुनील दत्तसोबतचा ‘ज्वाला’ तिचा शेवटचा चित्रपट. दिलीप कुमारचे तिच्यावरचे निस्सीम प्रेम आणि किशोर कुमारशी तिने केलेले लग्न अशा अनेक गोष्टी कायमच चर्चेत होत्या. दिलीप कुमारने भर कोर्टात तिच्यावरील आपल्या प्रेमाची साक्ष दिली. ती फार गाजली. प्रेमनाथही तिच्या प्रेमात होता.

‘मधुबाला’ या आगामी चित्रपटात यातले काय दाखवणार नि काय लपवणार? सत्य पडद्यावर आणणार की कल्पना? दिलीप कुमार, किशोर कुमार कोण साकारणार? असे अनेक प्रश्न आहेतच. मधुबालाचा काळ प्रामुख्याने ब्लॅक आण्ड व्हाईट चित्रपटांचा. तिचा चरित्रपट तसाच असेल तर जास्त परिणामकारक ठरेल. तिचं रूपडं पडद्यावर कोण साकारणार? मेकअपने किती गोष्टी साध्य होणार? मधुबालाची मधाळ नजर कुठून आणणार? स्पेशल इफेक्ट्स वा कॉम्प्युटरच्या सहाय्याने कदाचित अनेक गोष्टी जुळवून आणता येतीलही. पण मूळ गोडवा कसा आणणार?

चित्रपटाची घोषणा तर झालीच आहे. आता मधुबाला आणि इतर कलाकार, 60-70 वर्षांपूर्वीचा काळ उभा करणारे कला दिग्दर्शक, छायाचित्रणकार कोण कोण असतील याची उत्तरे मिळपर्यंत मधुबालावरची गाणी पाहून घेऊ.

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार समीक्षक आहेत)