आकर्षक अंबाडा

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

थोडी क्रिएटिव्हिटी, थोडासा अभ्यास आणि एक-दोन वेळा केलेला प्रयत्न यामुळे आकर्षक अंबाडे, फ्रेंच रोल किंवा वेगवेगळय़ा छोटय़ा हेअरस्टाइल करू शकता आणि तुमचा एपंदरीतच लुक परिपूर्ण करू शकता.

सण-समारंभ घरातला असो, एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या घरातला, त्यासाठी तयार होणे हे आलेच. अनेक वेळा मेकअप साधा, सोपा का होईना पटकन केला जातो. साडी नेसली जाते किंवा ड्रेस घातला जातो. पण हेअरस्टाइल करताना मात्र अनेक वेळा आपल्याला खूप विचार करावा लागतो. मेकअपबरोबर हेअरस्टाइल केलेली असेल तर आपला एपंदरीतच लुक क्लासिक आणि छान दिसतो.

पुढील केसांसाठी म्हणजेच क्राऊन एरियासाठी वेगवेगळय़ा वेण्यांचे प्रकार पफ केसांना वेगवेगळय़ा प्रकारे पिळ देऊन ते केस थोडे हलकेसे खेचून त्याचीही वेगवेगळी स्टाइल तुम्ही पुढील केसांसाठी करू शकता. मागच्या केसांसाठी वेगवेगळे डोनट रबर बँड आणि केसांपासूनच केलेल्या वेण्या किंवा पिळा यापासून वेगवेगळे साधे, सोपे अंबाडे तुम्ही पटकन घालू शकता. त्याचे काही प्रकार आपण पाहू या.

– प्रथम केसांचे मधले पार्टिशन करून नंतर मागच्या भागातील केसांचा पोनी करून घेणे. त्याचा अंबाडा घालून तो अंबाडा पुल करून घेताना त्याला हलक्या-हलक्या लाइन्स क्रिएट केल्या आणि पुढील केसांना हलकेसे बॅककोम करून पफ घेतला तर हा अंबाडादेखील सुंदर व क्लासिक दिसतो. त्यावर तुम्ही एखादे गुलाब, गजऱयांनी हा अंबाडा सजवू शकता.

– क्राऊन एरियातील केस प्रथम वेगळे करून घेऊन मागच्या केसांचा पोनी घालून व त्या पोनीमध्ये डोनट अडकवून त्या डोनटवर संपूर्ण मागचे केस पसरवून घेऊन त्यावर एक रबर बँड लावणे आणि उरलेल्या केसांना या डोनटभोवती गुंडाळून त्याला व्यवस्थित काटे लावून घेणे, पुढील केसांना नीट आणि क्लीन असे विंचरून तुम्ही छानसा लुक देऊ शकता.

– पुढील केसांची सागर वेणी घालून मागच्या केसांना दोन वेण्या घालून घेणे आणि या दोन्ही वेण्या कानाजवळ न येता थोडय़ा मागेच बांधणे व या दोन्ही वेण्या एकमेकांमध्ये गुंतवून त्याचाही सुंदर अंबाडा तुम्ही तयार करू शकता. पुढील केसांच्या सागर वेणीतील उरलेले केस या अंबाडय़ाभोवती गुंडाळावे.

– केस जर लांब असतील तर पुढील केसांचा साइड पार्टिशन करून किंवा मध्ये भाग पाडून दोन्ही साइडला हलक्याशा पीळ घेऊन पाठीमागे त्याला पिनअप केले आणि मागच्या केसांनी दोन भागांत डिवाइड करून त्या दोन्ही भागांना पिळ देत प्रथम पहिला भाग गुंडाळून घ्यायचा व त्याला काटे लावून घ्यायचे, दुसरा भाग पूर्ण त्याला उलटय़ा दिशेने गुंडाळून घ्यायचा व त्यालाही काटे लावून घ्यायचे अशा रीतीने सुंदर चक्रासारखा छान अंबाडा तयार होतो.

– पुढील केसांना पफ घेऊन मागच्या केसांचा फ्रेंच रोलदेखील तुम्ही घालू शकता. हा फ्रेंच रोल घालताना संपूर्ण केस थोडे डाव्या साइडकडे नेऊन पाठीमागच्या केसांना अंगठय़ावर फिरवून त्याला हलकासा पीळ देत त्याचा तुम्ही फ्रेंच रोल तयार करू शकता. तुम्हाला जर तसे जमत नसेल तर तुम्ही मागच्या केसांचे तीन पोनी घालून या तिन्ही पोनींना एकदा एकत्र असा पुन्हा रबर बँड लावून तोदेखील तुम्ही पाठीमागे जर फिरवून घेतला आणि उरलेले केस जर आतमध्ये ढकलले तर तशाही पद्धतीने छान फ्रेंच रोल तयार होऊ शकतो.

[email protected]