ठसा – हेमंत जोगदेव

>> विठ्ठल देवकाते

तुटपुंजी संपर्काची साधने, थेट प्रक्षेपण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या जमान्यात आपल्या लेखणीतून क्रीडा सामन्यांचे रोमहर्षक वर्णन करून चित्र उभे करणारे, अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेले तपस्वी क्रीडा पत्रकार, बहुआयामी क्रीडा संघटक हेमंत जोगदेव यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे अवघ्या चार वर्षांनी हुकलेले आयुष्याचे शतक क्रीडा क्षेत्रातील सर्वांच्या मनाला चटका लावून गेले. पायजमा-शर्ट आणि पायात चप्पल अशी त्यांची साधीच दैनंदिन राहणी होती. उमेदीच्या काळात स्पर्धा असेल त्या मैदानावर हसतमुख चेहऱयाने हेमंत जोगदेव हजर असायचे. स्थानिक स्पर्धांबरोरबरच पाच ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेट वर्ल्ड कप आदी स्पर्धांच्या वार्तांकनासाठी त्यांनी देशविदेशात भटपंती केली. क्रीडा पत्रकार म्हणून क्रिकेट, हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी, खो-खो वगैरे शेकडो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन, विशेष लेखन, पुरवण्यांचे संपादन, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा संघटक यांच्या खास मुलाखती, मासिके, साप्ताहिके यांच्यासाठी क्रीडाविषयक लेखन असा त्यांचा चौफेर वावर असायचा. एसटीमध्ये नोकरी करतानाच त्यांनी दैनिक ‘केसरी’मध्ये 1965 ते 97 या काळात क्रीडा पत्रकारिता केली. वृत्तपत्रांमध्ये क्रीडा बातम्यांसाठी स्वतंत्र पान निर्माण करण्याचे श्रेय जोगदेव यांच्याकडेच जाते. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाषिक माध्यमांच्या प्रतिनिधींना वृत्तांकनासाठी अधिस्वीकृती (ऑक्रिडेशन) देण्यात येत नव्हती. तेव्हा संयोजकांपुढे ठामपणे बाजू मांडून अशी अधिस्वीकृती मिळविणारे ते पहिले मराठी क्रीडा पत्रकार ठरले होते हे विशेष. 1982मधील आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेगवेगळ्या स्टेडियमवरील सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी जोगदेव यांनी पुण्याहून नवी दिल्ली येथे स्कूटर नेली होती. एवढे ते उत्साही क्रीडा पत्रकार होते. क्रीडा संघटक म्हणून त्यांनी अनेक खेळांसाठी योगदान दिले. पुणे जिल्हा कबड्डी संघटना, पुणे जिल्हा खो-खो संघटना, राणा प्रताप कबड्डी संघाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. राज्य, राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांचे नियोजन, क्रिकेटच्या धर्तीवर देशी खेळांसाठी खास गुणफलकाची उभारणी, विविध क्रीडा समित्यांवर काम, राज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कार समितीवर सहा वर्षे सदस्य, क्रीडाविषयक चर्चासत्रे आणि राष्ट्रीय स्तरावरील परिसंवाद तसेच व्याख्यानमाला यात जोगदेव हिरिरीने सहभागी व्हायचे. आकाशवाणीवरून विविध खेळांच्या स्पर्धांचे धावते समालोचन, याचबरोबर समीक्षणात्मक विश्लेषणातही हेमंत जोगदेव निष्णात होते. निवृत्तीनंतरही त्यांची मुक्त क्रीडा पत्रकारिता बहरतच गेली. वृत्तपत्रांतील लेख आणि पुस्तके असे लेखन त्यांनी सुरू ठेवले होते. ‘क्रीडा पत्रकारिता’, ‘क्रीडा वेध’, ‘ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स’, ‘असे आहे ऑलिम्पिक’ आदी दहा पुस्तकांचे लेखन हेमंत जोगदेव यांनी केले. खेळांचा दांडगा अभ्यास आणि जबरदस्त लेखनशैली लाभलेले जोगदेव हे क्रीडा विश्वाचा चालता बोलता विकिपीडियाच होते. ऑलिम्पिक कोश तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते. मात्र हे काम पूर्ण होण्यापूर्वीच हा तपस्वी क्रीडा पत्रकार 29 फेब्रुवारीला इहलोकीच्या यात्रेवर निघून गेला. ऑलिम्पिक क्रीडा कोश तयार करण्याचे हेमंत जोगदेव यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे हीच खऱया अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल.