पाऊलखुणा – संगमेश्वरचा शिंपणे महोत्सव

>> आशुतोष बापट

कोकणात शिमगा आणि गौरीगणपती हे सगळ्यात मोठे उत्सव आहेत, पण संगमेश्वर इथल्या जाखमातेच्या शिंपणे महोत्सवाचे महत्त्व या सगळ्यापेक्षा जास्त आहे. संगमेश्वरसारखाच शिंपणे महोत्सव देवरुख इथल्या सोळजाई देवीचा केला जातो. उत्सवप्रिय कोकणी माणूस या वेळी तनमनधनाने या शिंपणे महोत्सवात सामील झालेला बघायला मिळतो.

कोकणी माणूस मुळातच उत्सवप्रिय आहे. कुठलाही उत्सव असो, कोकणी माणूस अगदी तन-मनधनाने त्यात सहभागी झालेला असतो. शिमगा आणि गणपती हे कोकणी माणसाचे अगदी जीवश्चकंठश्च उत्सव आहेत. त्या वेळी तो सगळे जग विसरून या दोन उत्सवांमध्ये स्वतला झोकून देतो. या उत्सवांसोबत ग्रामदैवताची जत्रा, देवीचे निशाण, शिवरात्रीची कुणकेश्वरची जत्रा, आंगणेवाडीच्या देवीची जत्रा असे इतर उत्सवसुद्धा कोकणात तेवढय़ाच धडाक्यात साजरे होतात. उत्सव म्हटले की, कोकणी माणसाच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसतो. या उत्सवांसारखाच अजून एक उत्सव संगमेश्वर परिसरात साजरा होतो तो म्हणजे ‘शिंपणे महोत्सव.’ या उत्सवाची तऱ्हाच न्यारी आहे. रंगांची उधळण हा या उत्सवाचा मूळ गाभा असला तरीही याची नाळ जुळली आहे ती ‘जाखमाता’ या देवीशी. या देवीच्या नावानेच हा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. नुसतीच परंपरा नाही, तर काहीएक इतिहासही या उत्सवाशी जोडला गेलेला आहे. काय आहे हा शिंपणे महोत्सव आणि कसे असते त्याचे स्वरूप हे जाणून घेणे खूप औत्सुक्याचे आहे.

देवीचा जागर, गावात फेरा, रंगांची उधळण, मटण-भाकरीचा प्रसाद असा सगळा साग्रसंगीत सोहळा म्हणजे संगमेश्वरचा शिंपणे महोत्सव. पूर्वापार सुरू असलेली ही उत्सवाची प्रथा जाखमाता या देवीशी निगडित आहे. पूर्वी फणसवणे इथे नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या भोयाला जाळ्यात एक दगड लागला. तो त्याने परत नदीत सोडून दिला. पुन्हा काही वेळाने तोच दगड परत जाळ्यात आला. त्याने पुन्हा तो दगड नदीत सोडला. तीनवेळा असे झाल्यावर त्या भोयाने तो दगड बाहेर काढून बाजूला ठेवला आणि त्यापुढे हात जोडून म्हणाला की, तुझ्यात जर दैवी शक्ती असेल तर मला भरपूर मासे मिळू देत. भोयाच्या जाळ्यात खूप मासे जमा झाले. ही कथा भोयाने गावात येऊन गावातील मान्यवर श्री. रेडीज यांना सांगितली. त्याच रात्री रेडीज यांच्या स्वप्नात देवीने येऊन सांगितले की, तो दगड म्हणजे मी जाखमाता आहे. माझी गावाच्या सीमेवर प्रतिष्ठापना करा आणि गावात रंगांचा उत्सव सुरू करा.

रेडीज यांनी त्या दृष्टांतानुसार गावातल्या अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून तो देवीचा दगड गावात आणला आणि देवीची स्थापना केली. फाल्गुन शुद्ध पंचमीला देवीचा रंगोत्सव सुरू झाला. तो काळ होता जंजिऱयाच्या सिद्दीचा. काही कारणाने सिद्दीने रेडीजना पकडून नेले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. इकडे गावकऱयांनी रेडीज यांच्या सुटकेसाठी देवीला साकडे घातले. देवी सिद्दीच्या स्वप्नात गेली आणि रेडीजना सोडायचा आदेश दिला. काटेरी मुकुट घालूनही रेडीज जिवंत पाहून सिद्दीने रेडीज यांची मुक्तता केली, त्यांना ‘शेटे’ ही पदवी दिली आणि त्यांना मानाने पालखीतून संगमेश्वरी पाठवून दिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य चतुर्दशीचा. देवीच्या कृपेमुळे रेडीज यांच्यावरचे मृत्यूचे संकट टळले म्हणून रेडीज यांची रंगांची उधळण करून मिरवणूक काढली आणि देवीला बोकडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून फाल्गुन वद्य चतुर्दशीला देवीचा शिंपणे महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.

शिंपणे उत्सवाच्या निमित्ताने देवीला मुखवटे लावले जातात. त्याला ‘रूपं लावली’ असे म्हणतात. शिंपण्याच्या आदल्या रात्री संगमेश्वर आणि रामपेठ इथून देवीचे दोन फेरे निघतात. ढोल आणि सनईच्या गजरात दोन्ही फेरे काढले जातात. रामपेठ इथला फेरा शेटे यांच्या घराशी येतो. तिथे घुगऱयांचा प्रसाद दिला जातो. शिंपण्याच्या दिवशी गोडधोड नाही, तर मटणाचा प्रसाद करण्याची इथे प्रथा आहे. देवीला नवसाचा बोकड दिला जातो. गावाच्या अडीअडचणी दूर होऊ देत म्हणून देवीला साकडं घातलं जातं. भूत मारक्या, भैरीचा गार्डी, गिरोबा, चंडिका या देवतांची समजूत घातली जाते.

…आणि मग सुरू होतो अखंड रंगोत्सव. ढोलाच्या, गाण्यांच्या तालावर सगळे नाचतात. सगळा गाव रंगांत न्हाऊन निघतो. उधळण केलेला इथला लाल रंग 10-15 दिवस जात नाही. हाच महोत्सव कसबा संगमेश्वर इथे पण केला जातो. त्यासाठी तलाव तयार केले जातात. त्यांना लेंडी असे म्हणतात. सगळे गावकरी या लेंडीमध्ये डुंबतात. संध्याकाळी मानकऱयांकडून लेंडी फोडली जाते.

रात्री देवीला मटणभाकरीचा महानैवेद्य दाखवला जातो आणि मग सगळ्या गावकऱयांना वाटला जातो. 25-30 बायका अव्याहत प्रसादाच्या भाकऱया करतात. 72 खेडय़ांची मालकीण असलेल्या जाखमातेचा हा रंगोत्सव अशा पद्धतीने मोठय़ा जोमाने साजरा केला जातो.

[email protected]

(लेखक  लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)