साय-फाय – पिरॅमिडच्या दुरुस्तीला विरोध

>> प्रसाद ताम्हणकर

इजिप्तमधील पिरॅमिडस् ही जेवढी जगभरातील संशोधकांना आव्हान देत असतात, तेवढीच ती जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असतात. प्राचीन संस्कृती, चालीरीती यांचे एक गूढ वलय लाभलेली ही पिरॅमिड कायम चर्चेचा विषय राहिलेली आहेत. आता पुन्हा एकदा ही पिरॅमिड जगभरात चर्चेचा विषय बनली आहेत ती एका वेगळ्या कारणाने. पिरॅमिडमध्ये कैरोच्या नैऋत्य वाळवंटात उभे असलेले द ग्रेट पिरॅमिड आणि त्याच्या बाजूला असलेली दोन लहान पिरॅमिड ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र गेल्या काही शतकांमध्ये या पिरॅमिडचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि आता इजिप्तच्या पुरातत्व खात्याला यातील मेनक्योर या लहान पिरॅमिडची दुरुस्ती आणि नूतनीकरण करायचे आहे. या निर्णयाला इजिप्तमधून आणि बाहेरील जगाकडूनही मोठय़ा प्रमाणात विरोध सुरू झाला आहे.

या सर्व पिरॅमिडमध्ये असलेला खजिना लुटला गेला आहे, त्यांच्या बाहेरच्या थरालादेखील मोठे नुकसान पोहोचले आहे. अशा वेळी जगासाठी एक मोठा सांस्कृतिक ठेवा असलेल्या या पिरॅमिडचा जीर्णोद्धार होणे गरजेचे असल्याचे इजिप्तच्या पुरातत्व खात्याला वाटते आहे. ही योजना म्हणजे या शतकातील सर्वात मोठा प्रकल्प असेल आणि इजिप्तने जगाला दिलेली सर्वात सुंदर भेटदेखील असे पुरातत्व खात्याच्या प्रमुखांचे मत आहे. परंतु ही योजना पुरातत्व संवर्धनाचे जे काही नियम आहेत, आखून दिलेली तत्त्वे आहेत त्याचे पालन करणारी नाही, असे अनेकांचे मत आहे आणि तेच या विरोधामागे प्रमुख कारण आहे.

इजिप्तच्या राजांनी शाही शवांचे जतन करण्यासाठी पिरॅमिडची उभारणी केली असे मानले जाते. आत्मा हा शरीराशिवाय वेगळा राहू शकत नाही अशी यामागे संकल्पना होती. पिरॅमिडचा वैशिष्टय़पूर्ण आकार आकाशातून पृथ्वीवर पसरलेल्या सूर्यकिरणांना दर्शवतो असादेखील एक मतप्रवाह आहे. या पिरॅमिडचे अग्र हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पिरॅमिडमधल्या एका खोलीमध्ये राजा, राणी यांची मृत शरीरे ममीच्या रूपात जतन केली गेली आहेत. या पिरॅमिडमधून मृत व्यक्ती आतल्या व बाहेरच्या अशा दोन्ही जगांच्या संपर्कात राहू शकत असे अशी इथली मान्यता होती. इथे लोक मृत व्यक्तीच्या शवाला भेट देण्यासाठी येत असत व प्रार्थनादेखील करत असत. त्यामुळे या पिरॅमिडकडे प्रार्थनास्थळ म्हणूनदेखील पाहिले जाते.

सध्या जो मेनक्योर पिरॅमिड दुरुस्तीमुळे चर्चेत आलेला आहे, तो गिझाच्या मैदानात असलेल्या पिरॅमिडस पैकी सर्वात लहान पिरॅमिड आहे. याची उंची 50 मीटर असून, तळाच्या बाजूने तो सर्व दिशांना 100 मीटर असा पसरलेला आहे. परंतु काही संशोधकांना विश्वास आहे की, हा पिरॅमिड दिसायला लहान असला, तरी पूर्वी तो इतर पिरॅमिडपेक्षा अधिक भव्य होता. याच्या खालच्या बाजूच्या भिंती ग्रॅनाइटने झाकलेल्या होत्या. आता मात्र हा थर केवळ 15 ते 29 टक्के एवढा उरला आहे. याचा बाहेरील थर पूर्णतः ढासळायच्या अवस्थेत असून, त्याच्या भिंतीला एक मोठे छिद्रदेखील आहे. इजिप्तच्या एका मध्ययुगीन राजाने ते पाडण्याचा प्रयत्न केला होता असे मानले जाते.

इजिप्तच्या पुरातत्व खात्याला मेनक्योरवर पुन्हा एकदा ग्रॅनाइटचा थर द्यायचा आहे. हा ग्रॅनाइट पूर्वीप्रमाणे नऊ थरांचा असणार आहे. सध्या सात थर चढवले जाऊ शकतील एवढा ग्रॅनाइट तिथे पूर्वीपासून उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र जगभरातील संशोधकांचा याला विरोध आहे. संशोधकांच्या मते, तिथे वापरण्यात आलेली मूळची चुनखडी ही चांगल्या दर्जाची नसल्याने त्यावर ग्रॅनाइटचा कोट त्या काळी चढवावा लागला होता. आता शेकडो वर्षांच्या ऊन-पावसाच्या माऱ्याने तिथल्या दगडांची अवस्था बिकट झाली आहे. ते पूर्वीप्रमाणे बळकट आणि स्थिर आहेत का याचा विचार किंवा पाहणीदेखील या योजनेपूर्वी करण्यात आलेली नाही. जी अत्यंत महत्त्वाची आहे.

देशातून व देशाबाहेरून होत असलेला हा विरोध पाहता, इजिप्त सरकार आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करेल अशी आशा सध्या संशोधक आणि पुरातत्वप्रेमी करीत आहेत.

[email protected]