राहुलला यष्टिरक्षण न करण्याचा ‘बीसीसीआय’चा सल्ला

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, केएल राहुलला आयपीएलसाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे. याचा अर्थ तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. एक-दोन दिवसांत तो संघात सामील होईल. लखनौ सुपर जायंट्स त्यांच्या आयपीएल मोहिमेला रविवारी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुरुवात करणार आहे. खरं तर बीसीसीआयच्या वैद्यकीय केएल राहुलला तंदुरुस्त घोषित केले आहे, मात्र राहुलला आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळायचा असेल तर त्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये यष्टिरक्षण न करण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला आहे. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीनंतर दुखापतीची तक्रार केली होती आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली होती.