सैन्यदलात डॉक्टर व्हा! शिस्तबद्ध वैद्यकीय प्रशिक्षणासाठी एएफएमसी

>> अविनाश कुलकर्णी

आर्म्ड फोर्सेसने 1948 मध्ये स्थापन केलेले एएफएमसी हे आशिया खंडातील पहिले महाविद्यालय आहे. नॅकद्वारे S+ मानांकन मिळवलेले आणि वैद्यकीय शिक्षणाबरोबर शिस्तीचेही धडे देणारे पुण्यातील हे महाविद्यालय भारतातील टॉप तीन मेडिकल कॉलेजेसपैकी एक समजले जाते.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भरपूर फी असल्यामुळे परिस्थितीने गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होणे सध्याच्या परिस्थितीत स्वप्नवत वाटते. अशा गरीब, पण होतकरू आणि तंदुरुस्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एएफएमसी म्हणजे आर्म्ड पर्ह्सेस मेडिकल कॉलेज (सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय) त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय आहे.

एएफएमसी कोर्सेस : या वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी. एस. हा मुख्य कोर्स असून याव्यतिरिक्त बी. एस्सी (नर्सिंग), पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशालिटी कोर्सेस तसेच लॅब टेक्निशियन, रेडिओग्राफिक टेक्निशियन, रेडिओथेरेपी टेक्निशियन, कार्डिओ टेक्निशियन, न्युरो टेक्निशियन, ब्लड ट्रान्सफ्यूजन टेक्निशियन, ऑप्टोमेटरी टेक्निशियन या आठ प्रकारच्या पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेश दिला जातो.

प्रवेश पात्रता व परीक्षा : एम.बी.बी. एस. या कोर्ससाठी 10+2 (इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी या विषयांसह विज्ञान शाखा) किमान 60% मिळवून उत्तीर्ण असणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतलेल्या नीट परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. एएफएमसीला आवेदन केलेल्या आणि शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांची या कॉलेजकडून स्क्रीनिंग टेस्ट (कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम) आणि आरोग्य तपासणी होऊन 115 मुले आणि 30 मुलींची फायनल निवड होते. नार्ंसगसाठी 40 तर पॅरामेडिकलच्या विविध कोर्ससाठी एकूण 95 जागा उपलब्ध असतात.

शैक्षणिक शुल्क : हे महाविद्यालय केंद्र सरकारच्या आर्म्ड फोर्सेस विभागाकडून नियंत्रित असल्यामुळे शैक्षणिक शुल्क अगदीच अत्यल्प असते. हे महाविद्यालय निवासी आहे. तरीही राहण्याचा आणि जेवणाचा खर्च स्वतंत्र घेतला जात नाही. पुस्तके घेणे, स्टेशनरी, ड्रेस घेणे, ड्रेस स्वच्छ करणे, जेवण, रेल्वे कन्सेशन इतर अनेक सुविधांसाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते.

पोस्टिंग : या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी मिळवलेल्या गुणवत्तेनुसार (रॅंक) आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स यापैकी एका सेना शाखेत परमनंट कमिशन किंवा शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी निवड होते. लेफ्टनंट, पॅप्टन, मेजर, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट जनरल या पदांची वेतनश्रेणी टप्प्याटप्प्याने लागू होते. सर्व विद्यार्थ्यांना काही वर्षे सशस्त्र सेनादलात सेवा देणे अनिवार्य असते. सेनाधिकाऱयांना मिळणाऱया सर्व सुविधा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळतात.
आपले कर्तव्य पार पाडताना उत्तम आरोग्य सांभाळून देशसेवाही करता येत असल्यामुळे अनेक विद्यार्थी एएफएमसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. https://afmc.nic.in या संकेतस्थळावर अधिक सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

व्यवसाय मार्गदर्शक आणि समुपदेशक