जामखेडमध्ये तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; रुग्णाच्या जीवाशी खेळ, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

जामखेड तालुक्यातील डोंगराळ भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विविध गावांसह दुर्गम गावे, पाडय़ांत अनेक बंगाली व अन्य बोगस डॉक्टर सर्रास उपचार करत आहेत. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हे बोगस डॉक्टर डोंगराळ खेडय़ापाडय़ातील जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. मात्र, याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. काही बोगस डॉक्टरांवर केवळ नावापुरती कारवाई झाली. तालुक्यात सुमारे वीस ते पंचवीस बोगस डॉक्टर आहेत आणि त्यांना ग्रामस्थ व ग्रामपंचायतींचाच पाठिंबा आहे.

जामखेड तालुक्यातील देवदैठण, धामणगाव, तेलंगशी, नाहुली, नायगाव दिघोळ, जातेगाव, फक्राबाद, धानोरा यांसह तालुक्यातील अनेक गावांत मोठय़ा प्रमाणावर बोगस बंगाली डॉक्टरांनी राजरोसपणे कोणतीही पदवी नसताना दवाखाने थाटले आहेत. मात्र, आरोग्य विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. बोगस डॉक्टर रुग्णांची कुठल्याही प्रकारची तपासणी न करता, रुग्णांना औषधांचा ओव्हर डोस देतात, म्हणून रुग्ण एक-दोन दिवसांत बरा होतो. परंतु, काहींना या ओव्हर डोसचा त्रास होऊन त्यांना तालुक्यासह शहरातील मोठय़ा दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. या रुग्णांना मानसिक त्रास व आर्थिक फटका बसतो. तर, काही रुग्णांवर चुकीचा उपचार होत असल्यामुळे जीवाला मुकावे लागत आहे. त्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येऊन, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी काही सजग ग्रामस्थांकडून होत आहे.

डोंगराळ तसेच दुर्लक्षित खेडय़ापाडय़ांतील भागातील प्रत्येक गावात कानाकोपऱयात भाडय़ाचे घर घेऊन त्यांचा बिनदिक्कतपणे वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे. त्यांच्याविषयी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांनी तक्रार दिल्यास फिर्यादीवर स्थानिक पदाधिकाऱयांमार्फत दबावतंत्राचा वापर करून प्रकरणे दडपली जातात. त्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांवर कोणाचा धाक नसल्यामुळे ते बिनधास्तपणे राहतात.

बंगाली डॉक्टरांकडे (बीआयएएमएस) बंगाल राज्यातील प्रमाणपत्र आहेत व अन्य डॉक्टरांकडे कसलीही पदवी नसताना बनावट बीएएमएस पदवीचे प्रमाणपत्र दाखवतात. काहींकडे आयुर्वेदिक पदव्या असतानाही ऍलोपॅथिक औषधे वापरले जात आहेत. अधिकृत डॉक्टरांच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणाऱया या बोगस डॉक्टरांचा खेळ थांबवणे शक्य होणार आहे. मात्र, स्थानिक लोक याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत, म्हणूनच आरोग्य विभागाला या प्रकरणाविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

समिती फक्त नावालाच का?

नगर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने सामूहिक धडक मोहीम राबवावी; पण आरोग्य विभागाच्या मते तालुक्यात कुठल्याही बोगस डॉक्टरांवर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समिती फक्त नावालाच का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायतींचाच पाठिंबा

जामखेड तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर ग्रामस्थ व ग्रामपंचायतींचाच पाठिंबा आहे. या डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थ विरोध करतात तसेच आमच्या गावात कसलाही बोगस दवाखाना नाही, असे पत्र ग्रामपंचायतींनी आरोग्य विभागाला दिले आहे.