चॅम्पियन्स लीग फुटबॉल; रियल माद्रीद, बायर्न म्यूनिक उपांत्यफेरीत

रियल माद्रीद व बायर्न म्यूनिक या संघांनी गुरुवारी युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. रियल माद्रीदने उपांत्यपूर्व लढतीत मँचेस्टर सिटीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला, तर बायर्न म्यूनिखने आर्सेनलला हरविले.

रियल माद्रीद व मँचेस्टर सिटी यांच्यातील लढत निर्धारित वेळेत 1-1 अशी बरोबरीत सुटली. त्यानंतर पहिल्या लेगमध्ये 3-3 अशी बरोबरी झाली. मग अंतिम निकालही 4-4 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे ही लढत पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. येथे रियल माद्रीदने 4-3 गोल फरकाने बाजी मारत आगेकूच केली. मॅनचेस्टर सिटीच्या एतिहाद या होमग्राऊंडवर ही लढत झाली. रॉड्रिगोने 12 व्या मिनिटाला गोल करीत माद्रीदचे खाते उघडले होते, मात्र मँचेस्टर सिटीचा स्टार मिडफिल्डर केविन डे ब्रुने याने 76 व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. मग निर्धारित वेळेपर्यंत ही गोल बरोबरीची कोंडी फूटू शकली नाही.

म्यूनिकचा आर्सेनलवर 1-0ने विजय

दुसऱया उपांत्यपूर्व लढतीतील दुसऱया लेगमध्ये बायर्न म्यूनिकने आर्सेनलचा 1-0 गोलफरकाने पराभव केला. जर्मनीच्या एलियांझ एरिना स्टेडियमवर झालेल्या या लढतीतील एकमेव गोल्डन गोल बायर्न म्यूनिकच्या जोशुआ किमिचने केला. उभय संघांतील पहिल्या लेगचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतील एकूण गोलफरक 3-2 असा राहिल्याने बायर्न म्यूनिकने बाजी मारली.