Lok Sabha Election 2024 : वायनाडमधून राहुल गांधी रिंगणात

वायनाडच्या मतदारांचा प्रतिनिधी होणे, तुमचा खासदार होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मानव-प्राणी संघर्षासह इथल्या प्रत्येक समस्येसाठी मी आवाज उठवीन, असे जाहीर करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

इंडिया आघाडीतच सामना

इंडिया आघाडीचा भाग असलेल्या माकपच्या अॅनी राजा याही वायनाडमधून उभ्या आहेत. भाजपने राहुल यांच्याविरोधात प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना रिंगणात उतरवले आहे. 2019 मध्ये राहुल याच जागेवरून चार लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते.

रोड शोमध्ये राहुल यांचा दिल से संवाद

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल यांनी केलेल्या कालापेट्टा ते सिव्हिल स्टेशन अशा रोड शोसाठी कार्यकर्ते आणि समर्थकांसह हजारो लोक जमले होते. प्रियंका गांधी याही त्यांच्यासमवेत होत्या. या रोड शोसाठी लोटलेल्या प्रचंड गर्दीशी राहुल यांनी संवाद साधत, वायनाड हे माझे घर आहे, तुम्ही माझे केवळ मतदार नाही तर घरातले सदस्य आहात. माझी धाकटी बहीण प्रियंकाशी जसा वागतो तसाच मी तुमच्याशी वागतो. मानव-प्राणी संघर्षासह सर्वच समस्यांसाठी मी नेहमीच तुमच्यासोबत आहे, असे सांगितले.