दिल्ली डायरी – ‘मोदी गॅरंटी’ आणि मित्रपक्षांची ‘व्हॅलिडिटी’!

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे भक्तमंडळ देशभरात ‘मोदी गॅरंटी’ची घोषणा देत फिरत आहेत. मात्र ही गॅरंटी देशवासीयांना देत असताना मित्रपक्षांची ‘व्हॅलिडिटी’ मात्र संपवली जात आहे. हरयाणातील भाजपने कालपर्यंत मित्रपक्ष असलेल्या जननायक पक्षाचे सर्वेसर्वा आणि मावळते उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना अलगदपणे अडगळीत फेकले. त्यांचा पक्ष पह्डून ‘मोदी गॅरंटी’ काय असते हे देशभरातील आपल्या मित्रपक्षांना दाखवून दिले. ‘गरज सरो वैद्य मरो’ असे धोरण दिल्लीकरांचे आहे. त्यामुळे आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात जाणार आहेत. हरयाणातील नेतृत्वबदलाचा व सत्ताबदलाचा धडा तरी हेच सांगतो.

हरयाणात मनोहरलाल खट्टर नावाचे सदगृहस्थ मुख्यमंत्री झाले त्यामागे निश्चितच ‘मोदी गॅरंटी’ होती. हे खट्टर मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर त्या राज्यात खट्टर नावाने गुगल करण्यात आले. कारण ‘भाईसाब काwन लागे यो खट्टर?’ असा प्रश्न गावागावांत लोकांच्या मनात होता. मात्र खट्टर कधीकाळी नरेंद्र मोदींसोबत प्रचारक होते. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या जुन्या मित्राला थेट मुख्यमंत्री बनवून मैत्रीचे पांग फेडले. मोदींचे मित्र या एकाच कर्तबगारीवर खट्टर यांनी सलग नऊ वर्षे राज्य कसेबसे सांभाळले. मात्र याचे दाहक चटके त्या राज्याने अनुभवले. दिल्लीच्या सीमेवर झालेली दोन्ही शेतकरी आंदोलने हाताळण्यात खट्टर सपशेल अपयशी ठरले. पहिल्या आंदोलनावेळी शेतकऱ्यांना दिल्लीकडे कूच करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी खिळे वगैरेही अंथरले. दुसऱ्या आंदोलनाने हरयाणात प्रवेश करू नये, यासाठी संभू सीमेवर अश्रूधुरांच्या नळकांडय़ा पह्डल्या. शेतकऱ्यांवर जनरल डायरसारखे अत्याचार खट्टर यांनी केले. हे करत असतानाच भ्रष्टाचाराला हरयाणात ऊतमात आला. केवळ चौटालांनीच राज्य लुटले नाही तर खट्टर आणि कंपनीनेही वेगळे काही केले नाही. अर्थात आपले मित्रप्रेम अंगाशी येत असल्याचे पाहून नरेंद्र मोदींनी योग्य वेळी मित्रवर्यांना नारळ दिला. ओबीसी नायब सैनींना मुख्यमंत्री करून भाजपने सामाजिक संतुलन राखले. जाटांचे प्राबल्य असलेल्या राज्यात बिगरजाट मुख्यमंत्री बनवून भाजपने मतांच्या विभागणीचा डाव खेळला. हरयाणातील सत्ताबदलात दुष्यंत चौटाला व त्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे कारनामे हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, अशीही मोदी गॅरंटी दिली होती. मात्र दुष्यंतांनी ही गॅरंटी यमुनेत बुडवून भ्रष्टाचाराची अशी लयलूट केली की, त्याच्या सुरस दंतकथा बनल्या आहेत. या दंतकथेत भाजपचेही खट्टर यांच्यासकट अनेक जण पात्र राहिले आहेत. सोनिपतचे खासदार रमेश कौशिक यांचा एक आपत्तीजनक व्हिडीओ सार्वजनिक झाला. तिसऱ्यांदा लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी काwशिक यांनी खट्टर यांच्याशी आर्थिक व्यवहार केला होता. मात्र मोदी गॅरंटी असताना तिकिटासाठी खट्टर गॅरंटी दिसेनासी झाल्यावर कौशिक यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यातून काwशिक यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. हा सगळा प्रकार पंतप्रधानांच्या कानावर गेल्यानंतर मोदींनी खट्टरांचा गाशा गुंडाळला. शेतकऱयांची नाराजी नको यासाठी फुंकर म्हणून खट्टरांचा पत्ता उडविण्यात आला. ‘मोदी गॅरंटी’ खट्टर व दुष्यंत यांच्या कामी आली नाही. भाजपच्या मित्रपक्षांचा कधीही ‘दुष्यंत’ होऊ शकतो हाच हरयाणाचे सत्ताबदलाचा अर्थ!

वाचाळवीरांच्या तोंडाला कुलूप

‘बेताल बडबडू नका. नाहक वाद ओढवून घेऊ नका’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार आपल्या पक्षातील नेत्यांना बजावत होते. तरीही उचलली जीभ लावली टाळय़ाला या नात्याने भाजपच्या नेत्यांनी बेतालपणाचा ताळतंत्र सोडला होता. आता लोकसभेच्या यावेळच्या यादीत या बेतालांची तिकिटे कापून त्यांच्या तोंडाला भाजप नेतृत्वाने कुलूप घातले आहे. अर्थात, भाजपने हे काम काही देशहितासाठी किंवा सामाजिक स्वास्थ्यासाठी केलेले नाही, तर भाजप नेत्यांच्या अशोभनीय वक्तव्यांमुळे पक्षाचेच नुकसान होत होते व त्याची राजकीय किंमतही पक्षाला मोजावी लागत होती. शेवटी अति झाल्यावर बेतालांच्या तोंडाला कुलूप ठोकले. साध्वी प्रज्ञासिंग यांचा यात पहिला नंबर लागतो. आता नव्या यादीत लोकसभेत खासदार दानिश अली यांचा हिणकस उल्लेख करणारे भाजपचे मवाली खासदार रमेश बिधुडी यांचाही पत्ता साफ करून भाजपने बेतालांना इशारा दिला आहे. संसदेत ज्यांच्या पासवर प्रवेश करून घुसखोरी कांड झाले त्या म्हैसुरच्या प्रताप सिन्हा यांचेही तिकीट पक्षाला कापावे लागले आहे, तर सतत वादग्रस्त विधाने करणारे कर्नाटकातले बेताल अनंतकुमार हेगडे यांनाही भाजपने घरचा रस्ता दाखविला आहे. गौतम गंभीर महाशयांना पक्षाने आयपीएलसाठी मोकळे सोडले आहे. सत्यपालसिंग यांचा मतदारसंघच राष्ट्रीय लोकदलाला सोडल्यामुळे सत्यापालांवर गृहस्थाश्रमात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

चंद्रशेखर यांची कैफियत

केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांची ओळख टेक्नोव्रॅट व मीडियातील मोठे नाव अशी आहे. पक्षाने त्यांना यावेळी शशी थरूर यांच्याविरोधात तिरुअनंतपुरममधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने चंद्रशेखर चांगलेच गांगरून गेले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाल्यानंतर आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना चंद्रशेखर यांना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी भेटले. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर चंद्रशेखर यांनी आपले रडगाणे हरदीप यांच्यापुढे गायले. शशी थरूर यांच्याविरोधात निवडणूक जिंकणे किती अवघड आहे हे आपण जाणताच, असे सांगून आपली पैफियत मांडली. त्यावर हरदीप यांनी काळजी नको, गेल्या वेळी निवडणूक हरूनदेखील आता माझ्याकडे दोन महत्त्वाची खाती आहेत, असे सांगत चंद्रशेखर यांना दिलासा दिला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला. वास्तविक, चंद्रशेखर हे बंगळुरूमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना केरळात तेही थेट थरूर यांच्याविरोधात मैदानात उतरविल्यामुळे ते गोंधळले आहेत. थरूर गेल्या पंधरा वर्षांपासून तिथले खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँगेसला 41.15, तर भाजपला 31.26 टक्के मते मिळाली होती. सुमारे दहा टक्क्यांचे मतांचे हे अंतर आपण पार करू याची ‘गॅरंटी’ खुद्द चंद्रशेखर यांनाच नाही. शिवाय थरूर मैदानात असल्याने या निवडणुकीला एक वेगळे ग्लॅमरही आहेच. त्यामुळे ब्रिटिश असेंटमध्ये इंग्लिश बोलण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास अधिक महत्त्वाचा आहे, असा प्रचार सुरू करून चंद्रशेखर यांनी थरूर यांच्याविरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात ते कळेलच.