मस्कच! हिंदुस्थानी डॉक्टरसाठी मदतीचा हात

मूळच्या हिंदुस्थानी असलेल्या डॉ. कुलविंदर कौर गिल यांच्या मदतीसाठी टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क धावून आले आहेत. डॉ. कौल गिल यांची दोन कोटी रुपये कायदेशीर फी एलन मस्क भरणार आहेत. 2020 मध्ये कॅनडामध्ये लसीकरण मोहीम सुरू होती. या वेळी डॉ. कुलविंदर यांनी सरकारविरोधात ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. यावरून कॅनडामधील काही मीडिया संस्थांनी कुलविंदर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली होती, तसेच ट्विटरने डॉ. कुलविंदर यांच्यावर बंदी घातली होती. ओन्टारियोच्या कॉलेज आणि फिजिशियन व सर्जन यांनीही कुलविंदर यांच्यावर कारवाई केली होती. एका ट्विटमुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडलेल्या डॉ. कुलविंदर यांना कायदेशीर फी भरण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. डॉ. कुलविंदर गिल क्राऊड फंडिंग करीत आहेत ही माहिती समजताच एलन मस्क डॉ. कुलविंदर गिल यांच्या मदतीला धावून आले.