मतदानावेळी लावली जाणारी शाई पुसली का जात नाही? वाचा ही रंजक माहिती

vote-election-ink

जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही तासांवर त्याची सुरुवात आलेली आहे. शुक्रवारी या प्रक्रियेतला पहिला टप्पा पार पडेल. लोकशाही व्यवस्थेचा सगळ्यात मोठा कणा असलेली गुप्त मतदान पद्धती आणि त्याची ओळख म्हणजे हातावर लावलेली शाई. पण, ही शाई मात्र साधीसुधी नसते. ती खूप प्रयत्न करूनही पुसली जात नाही. नेहमीपेक्षा वेगळी असलेली ही शाई नेमकी कशापासून बनवतात? ही शाई लावण्याची पद्धत नेमकी कधी रुढ झाली? याचा इतिहास रंजक आहे.

मतदानावेळी आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीला नखाच्या टोकापासून ते नखाच्या शेवटापर्यंत जाणारी निळसर काळी शाई लावली जाते. ही शाई तुम्ही मतदान केल्याचा पुरावा असते. या शाईचा अंतर्भाव मतप्रक्रियेत करण्याचं संपूर्ण श्रेय जातं ते या देशातले पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना. ही शाई पाण्याचा बेस असलेली असते. त्यात सिल्व्हर नायट्रेट, अनेक प्रकारचे रंग (डाय) आणि काही विद्रावक पदार्थ यांचं मिश्रण असतं. याला सामान्य भाषेत इलेक्शन इंक किंवा इंडेलिबल इंक असं म्हणतात. ही शाई एकदा लावल्यानंतर 40 सेकंदांच्या आत सुकते आणि नखं व त्वचेवर आपली छाप सोडते.

गंमत म्हणजे, या शाईचं पेटंट करवण्यात आलेलं नाही. कारण, तसं केल्यास या शाईच्या अमिट असण्यामागचं रहस्य उघड होईल. त्यामुळे गुप्तता पाळण्यासाठी हे रहस्यच राहू दिलं आहे. दिल्ली येथील नॅशनल फिजिकल प्रयोगशाळेचे रसायनतज्ज्ञ डॉ. नाहर सिंग हे सध्याचे या शाईचे संरक्षक म्हणजेच कस्टोडियन म्हणून काम करतात. एनपीएलकडे या शाईच्या निर्मितीविषयी काहीही लेखी पुरावा नाही. असं म्हणतात की औद्योगिक अनुसंधान परिषदेचे शास्त्रज्ञ सलीमुज्जमा सिद्दिकी यांनी या शाईची निर्मिती केली. पण त्यानंतर ते पाकिस्तानात गेल्याने हिंदुस्थानातील त्यांचं काम त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळलं. 1962मध्ये देशातील तिसऱ्या मतदानावेळी सर्वप्रथम या शाईचा वापर करण्यात आला, जेणेकरून मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक राहील.

डॉ. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, ही शाई पाणी, डिटर्जंट, साबण किंवा अन्य कोणत्याही विद्रावकाने पुसली जाऊ शकणार नाही, असं या शाईचं संयुग बनवण्यात आलं आहे. या शाईने त्वचेला काहीही नुकसान होत नाही. शाईचं चिन्हं नखांवर काही काळ राहतं, हळू हळू नखं वाढलं की ते निघून जातं. ही शाई आता दक्षिण हिंदुस्थानातील म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड नावाची कंपनी बनवते. ही शाई फक्त निवडणुकीवेळी सरकारशी संबंधित संस्थांना पुरवली जाते. 2024 च्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला या कंपनीने सुमारे 28 लाख बाटल्या पुरवल्या आहेत. याची किंमत सुमारे 58 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ही शाई हिंदुस्थानाखेरीज मलेशिया, कॅनडा, कंबोडिया, घाना, आयव्हरी कोस्ट, अफगाणिस्तान, तुर्कस्थान, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, मादगास्कर, सिंगापूर, दुबई, लियोन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, मंगोलिया यांसह सुमारे 35 देशांमध्ये निर्यात केली जाते.