Lok Sabha Election 2024 : EVM बनवणारी कंपनी करतेय बक्कळ कमाई! 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्वच निवडणुकांमधील वादग्रस्त मुद्दा म्हणजे EVM . जेव्हापासून ईव्हीएमचा वापर मतदानासाठी करण्यात आला आहे. तेव्हापासून ईव्हीएमच्या वापरावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ईव्हीएम हे केवळ मतदानापुरते मर्यादीत नसून पैसे कमवण्याचेही एक महत्त्वपूर्ण साधन आहे.

Electronic Voting Machine (EVM) देशाच्या लोकशाहीमध्ये सध्या या मशिनला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. देशभरात लोकसभेच्या 543 जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 543 जागांसाठी हजारो उमेदवार रिंगणात उभे असून या उमेदवारांचं भवितव्य EVM वर अवलंबून आहे. पण तुम्हाला EVM चा इतिहास माहित आहे का? EVM  कोणत्या कंपन्या बनवतात? यामधील एक कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असून तिचे रिटर्न्स किती आहेत? या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

ईव्हीएमचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा 1982 साली केरळ राज्यातील परवूर विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले आणि 2001 साली तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला. तत्पुर्वी 1998 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमची चाचणी घेण्यात आली होती. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा देशात मतदानासाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला.

2013 साली ईव्हीएमच्या सोबतीला VVPAT मशीन जोडण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील सर्व मतदारसंघात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात आले. पण ईव्हीएमच्या वापरावरून तेव्हाही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. असे असले तरी ईव्हीएम बनवणारी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये मोठी कमाई करत आहे आणि गुंतवणुकदारांना चांगला परतावा देत आहे.

ईव्हीएम बवनणाऱ्या दोन सरकारी कंपन्या आहेत. एक Electronics Corporation Of India आणि दुसरी Bharat Electronics या दोन कंपन्या ईव्हीएमची निर्मिती करतात. या दोन कंपन्यांपैकी भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 232.90 रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीने गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला आहे.

2019 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या शेअरचे मूल्य फक्त 29.38 रुपये इतके होते. मात्र 2023 पासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत वाढ व्हायला सुरुवात झाली. कंपनीने 2019 पासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना 702 टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. हिंदुस्थानच्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये ईव्हीएमचा पुरवठा करण्याची जबाबदारीही या दोन कंपन्यांवर आहे.