माझ्याविरोधात कटकारस्थान… ; हेमंत सोरेन यांच्या वहिनीने दिला JMMच्या सर्व पदाचा राजीनामा

झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांची सून आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या सदस्यत्वाचा मंगळवारी राजीनामा दिला. शिबू सोरेन यांना पत्र लिहीत त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सातत्याने पक्षात त्यांची उपेक्षा केली जात असून आपल्याविरोधात कट रचला जात आहे, असा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.

सीता सोरेन पत्रात म्हणतात, ‘मी झारडखंड मुक्ती मोर्चाची केंद्रीय महासचिव आणि सक्रिय सदस्य आहे. मी पक्षाची आमदार आहे, अत्यंत जड अंत:करणाने मी हा राजीनामा देत आहे.’ त्या म्हणाल्या, ‘माझे स्वर्गीय पती दुर्गा सोरेन हे झारखंड आंदोलनाचे अग्रणी योद्धे आणि महान क्रांतीकारक होते. त्यांच्या निधनानंतर मी आणि माझे कुटुंबिय उपेक्षित राहिलो आहोत. पक्ष आणि परिवाराच्या सदस्यांनी आम्हाला विलग केले आहे. जे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे. वेळेनुसार परिस्थिती बदलेल, अशी आशा केली होती. दुर्देवाने असे काही झाले नाही. झारखंड मुक्ती मोर्चाला माझ्या स्वर्गीय पतीने त्याग, समर्पण आणि नेतृत्व क्षमतेच्या आधारावर हा पक्ष बनवला. आज तो पक्ष राहिला नाही. मला हे पाहून फार दु:ख होत आहे. पक्ष आता त्या लोकांच्या हाती गेला आहे ज्याचा दृष्टीकोन, उद्देश आणि आदर्श आमच्या विचारांशी जुळत नाही.’

‘शिबू सोरेन यांनी आम्हाला एकत्र ठेवण्याचा कायम प्रयत्न केला. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. मला अलिकडेच लक्षात आले की, मी आणि कुटुंबाविरोधात कट रचला जात आहे, हे कळल्यावर फार दु:ख झाले. आणि त्यासाठी निश्चय केला की मला झारखंड मुक्ती मोर्चा आणि या कुटुंबाला सोडावे लागेल. मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तुमची आणि पक्षाची कायम आभारी असेन. माझे शुभाशिर्वाद कायम तुमच्यासोबत असतील’, असे सीता यांनी पुढे लिहिले आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ते अडकले आहेत. हेमंत सोरेन हे तुरुंगात आहेत. हेमंत यांच्या जागी चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या या निर्णयावर सीता सुरुवातीला असमाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर त्यांना पटवून देण्याचे दावे करण्यात आले.