औसा भुईकोट

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

दर्शनी भागातील शाही प्रवेशद्वारामुळे दुर्गप्रेमींच्या कायम स्मरणात राहणारा छोटेखानी सुंदर भुईकोट म्हणजे किल्ले औसा होय.

राकट आणि कणखर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील किल्ले संपदा पाहून झाली की, दुर्गप्रेमींना मराठवाडय़ाच्या मुलखातील अवशेष संपन्न भुईकोट किल्ले खुणावू लागतात. परांडा, नळदुर्ग, औसा, उदगीर, धारूर व धर्मापूरीसारखे सरस भुईकोट किल्ले या भागात आहेत. औसा भुईकोट लातूरपासून 21 किलोमीटरवर आहे. या भुईकोटाला संरक्षणासाठी चोहोबाजूंनी खंदक आहे. किल्ल्याकडे जाताना सुरुवातीला फरसबंदी वाटेवर एक प्रवेशद्वार दिसून येते. ते पार केले की, आपण औसा किल्ल्याच्या दर्शनी भागातील मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. या प्रवेशद्वारावर लक्ष वेधून घेणारी गजशिल्पे व आकर्षक मनोरे आहेत. हा किल्ला आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहू शकतो. किल्ल्यात प्रवेश करताच पुढे एकामागून एक वळणावळणाची प्रवेशद्वारांची मालिका पार करत आपण औसा किल्ल्याच्या मुख्य तट व बाहेरील तट यामध्ये असणाऱया शेरहाजीमध्ये येऊन पोहोचतो. मुख्य कोटात प्रवेश करण्याआधी आपण डावीकडील शेरहाजीत प्रवेशद्वारावर फारसी शिलालेख असलेला किल्लेदाराचा वाडा व बाहेरच्या बुरुजामध्येच बांधलेली एक सुंदर विहीर पाहून घ्यायची.

मुख्य कोटात प्रवेश करताच चारही बाजूंनी ओवऱया असलेला किल्ल्यातील महत्त्वाचा भाग येतो. निजामाच्या राजवटीत या ठिकाणी तहसील कार्यालय होते. या तहसील कार्यालयाच्या पिछाडीस औरंगजेबाने बांधलेली जामा मशिदीची वास्तू आहे. पुढे कोठाराच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱया आणि तळघरात जाण्यासाठी मार्ग आहे. या कोठाराच्या पुढे डाव्या बाजूला औसा किल्ल्याचे आकर्षण असलेली जलमहालाची वास्तू आहे. ही वास्तू चक्क जमिनीखाली बांधण्यात आली असून यात गारवा निर्माण होण्यासाठी याच्या माथ्यावर पाण्याचा एक उथळ हौद बांधला आहे. जलमहाल पाहून पुढे गेल्यावर ‘कटोरी विहीर’ नावाची पाणी काढायची मोट असलेली विहीर लागते. गडाच्या मध्यवर्ती भागातील अवशेष पाहून झाल्यावर आपण तटफेरी करायची. या तटफेरीत आपणास सूर्यमुख तोफ, पोर्तुगीज राजमुकूट कोरलेली तोफ यासोबत अनेक सुंदर तोफा पाहावयास मिळतात. याशिवाय इंग्रजी राजवटीत कर्नल मिडोज टेलरची वास्तव्य असलेली रंगमहालाची वास्तू पाहावयास मिळते. औसा किल्ल्याच्या दक्षिणेकडील तटावर माहूत असलेल्या हत्तीचे व शरभाचे सुंदर शिल्प दुर्गप्रेमींनी आवर्जून पहावे.

छोटेखानी अवशेष संपन्न भुईकोट पाहायचा असेल तर औसा किल्ल्याएवढा देखणा किल्ला नाही.

पराक्रमाची साक्ष
चालुक्य, यादव, बहमनी, निजामशाही आणि मुघल राजवट अनुभवणाऱया या किल्ल्याने महाराजांचा पराक्रमदेखील अनुभवला. 1670 च्या सुमारास महाराजांच्या आज्ञेने मराठय़ांच्या फौजेने औसा किल्ल्याच्या आसपास बरीच धामधूम केली. त्यावेळी औसाचा किल्लेदार औरंगजेबाला कळवतो की, ‘‘सीवाचे वीस हजार स्वार व पायदळ या प्रांतात येऊन लुटालूट करत आहेत. चौथाई वसूल करीत आहे. सध्या त्यांनी औसाच्या किल्ल्यापासून दोन कोसांवर डेरे दाखल केले आहेत. त्यांचा किल्ल्यावर हल्ला करण्याचा विचार दिसतो. तरी मी ठिकठिकाणी पडझड झालेल्या औसा किल्ल्याची दुरुस्ती केलेली आहे. तोफखानाही किल्ल्यावर नेऊन लढाईच्या तयारीने तैनात केलेला आहे. मी सावध आहे, परंतु सीवाच्या लोकांनी माझ्या जहागिरीतील मुलूख पूर्णपणे लुटलेला आहे. माझ्या हातात काहीही येत नाही. मला कोणतीही मदत मिळत नाही. माझी परिस्थिती बिकट आहे.’’ औरंगजेबाने मात्र या किल्लेदारास कोणतीही मदत केली नाही.