IPL 2024 : अशुतोषची झुंज अयशस्वी; रोमहर्षक लढतीत मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय

मुल्लानपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात पहिल्या डावात सूर्यकुमार यादवने (53 चेंडू 78 धावा) तुफान फटकेबाजी केली. तर दुसऱ्या डावात शशांक सिंग (25 चेंडू 41 धावा) आणि अशुतोष शर्माने (28 चेंडू 61 धावा) आक्रमक खेळ करत चाहत्यांना प्रभावीत केले. रोमहर्षक झालेल्या लढतीत अखेरच्या क्षणी मुंबईने बाजी मारत 9 धावांनी पंजाबचा पराभव केला.

193 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली. शिखर धवनच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधार पदाची जबाबदारी सॅम करणकडे सोपावण्यात आली होती. सलामीला आलेल्या सॅम करण (7 चेंडू 6 धावा) आणि प्रभासिमरन शुन्य या धावसंख्येवर माघारी परतले. रोसौव, लिव्हिंगस्टोन, भाटिया यांना सुद्धा लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. 49 या धावसंख्येवर पंजाबचा अर्धा संघ तंबुत परतला होता. कठीण परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा संघाच्या मदतीला शशांक सिंग आणि अशुतोष शर्मा धावुन आले. मात्र त्यांना इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. मुंबईकडून जसप्रीत आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी मुंबईला आमंत्रित केले. सलामीवीर इशान किशन (8 चेंडू 8 धावा) स्वस्तात माघारी परतला मात्र रोहित शर्माने (25 चेंडू 36 धावा) सूर्याकुमारच्या मदतीने संघाचा डाव सावरला. सूर्याकुमार यादवने 3 षटकार आणि 7 चौकरांच्या मदतीने 78 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने नाबाद 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा कुटल्या. तर कर्णधार हार्दिक पंड्या (6 चेंडू 10 धावा), टीम डेव्हिड (7 चेंडू 14 धावा), शेफर्ड (2 चेंडू 1 धाव) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात 192 धावांपर्यंत मजल मारला आली. पंजाबकडून हर्षल पटेल आणि सॅम करणने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या