IPL 2024 : इम्पॅक्ट प्लेअर मला मान्य नाही; रोहित शर्माने सांगितले त्याचे दुष्परिणाम

आयपीएलमध्ये 2013 पासून इम्पॅक्ट खेळाडूचा नवीन नियम लागू करण्यात आला. नवीन नियमानुसार सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्लेईंग 11 मधील एका खेळाडूच्या बदल्यात अतिरिक्त खेळाडू (गोलंदाज किंवा फलंदाज) उतरवण्याची मुभा सर्व संघांना देण्यात आली आहे. मात्र या नियमावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माने नुकत्याच मायकल वॉन आणि एडम गिलक्रिस्ट यांच्या ‘क्लब प्रेयरी फायर’ या युट्यूब कार्यक्रमामध्ये आपले मत मांडले. “क्रिकेट हा 11 खेळाडूंच्या सोबतीने खेळला जातो 12 खेळाडूंच्या नव्हे. मी इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा चाहता नाही. यामुळे अनेक हिंदुस्थानी खेळाडूंच्या खेळावर विपरीत परिणाम होत आहे. थोड्याशा मनोरंजनासाठी क्रिकेटपासून खूप काही हिरावले जात आहे. मी अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो,” असे म्हणत रोहित शर्माने इम्पॅक्ट प्लेअरच्या नवीन नियमावर नाराजी व्यक्त केली.

“मी अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो. वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबेसारखे अनेक खेळाडू गोलंदाजी करू शकत नाहीत. ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट नाही. याबद्दल काय करावे हे मला माहिती नाही परंतू मी या नियमाचा चाहता नाही. ही मनोरंजक गोष्ट आहे. कारण 12 खेळाडू मैदानात उतरू शकतात. तुम्ही अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज मैदानात उतरवू शकता, ” असे म्हणत रोहित शर्माने इम्पॅक्ट प्लेअर या नियमाची नकारात्मक बाजू मांडली.

Saamana Sports Express: क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या, वाचा फटाफट

“मी प्रशिक्षक राहुल द्रविड, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना भेटलेलो नाही. मी कोणालाही भेटलेलो नाही. अजित दुबईत गोल्फ खेळत आहेत. राहुल भाई मुंबईत त्यांच्या मुलाला खेळताना पाहत आहेत. तो (हार्दिक) ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळत आहे. तुम्ही मी, राहुल, अजित किंवा बीसीआयमधील कोणीही कॅमेऱ्यावर बोलताना दिसले नाही. म्हणजेच हे सर्व खोटे आहे,” असे म्हणत रोहित शर्माने जुनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या निवडीबाबत पसरत असलेल्या अफवांवर मौन सोडले.