Jalna crime news – 8 किलो गांजा जप्त, दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना शहरापासून जवळ असलेल्या रामनगर (साखर कारखाना) येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 8 किलो गांजा जप्त केला असून दोघांना जेरबंद केले आहे. 28 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 7 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. 28 मार्च रोजी रामनगर साखर कारखाना येथे एका स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून स्विफ्ट कारची क्रमांक (एम.एच. 41 व्ही 3361) झडती घेतली असता 8 किलो 182 ग्रॅम गांजा आढळून आला.

पोलिसांनी कारमधील गणेश गोपिनाथ सोळुंके आणि प्रदीप सिताराम फुलमाळी यांना ताब्यात घेतले असून कार, मोबाईलसह एकूण 7 लाख 32 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींसह अन्य दोघांविरुद्ध मौजपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाईपोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सुधीर वाघमारे, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे, सतीष श्रीवास, सचीन आर्य, भागवत खरात सर्व स्थागुशा जालना चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे यांनी केली.