पेन्सिलीच्या टोकावर साकारले श्रीराम

अनेक कलावंत कलेच्या माध्यमातून श्रीरामाप्रति भक्तिभाव अर्पण करत आहेत. नाशिकमधील आयटी इंजिनीअर जीवन जाधव यांनी पेन्सिलीच्या टोकावर चक्क श्रीरामाची मूर्ती साकारली आहे. 1.5 सेंटिमीटर आकाराची ही अत्यंत लहान मूर्ती त्यांनी मायक्रोस्कोपच्या सहाय्याने तयार केली आहे.

जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलीच्या टोकावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, लालबागचा राजा, महेंद्रसिंग धोनी, गणरायाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे. एकाच पेन्सिलीवर ए टू झेड अक्षरेही काढली आहेत. पेन्सिलीच्या शिसावर 93 कडींची साखळी करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

या अनोख्या कलेविषयी जीवन जाधव म्हणाले, ‘‘शाळेत असताना मी खडूवर कलाकृती साकारत होतो. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना माझ्या मित्राने मला लीड काार्ंवगचा व्हिडीओ पाठवला. तो पाहून मीदेखील पेन्सिलीच्या टोकावर कलाकृती साकारायचे ठरवले. आतापर्यंत मी अनेक महनीय व्यक्ती, खेळाडू, देवदेवतांच्या मूर्ती या पद्धतीने साकारल्या आहेत.’’