अंगदुखीपासून सुटका

>> वैद्य सत्यव्रत नानल

अंगदुखीवर उपाय जाणून घेऊया. अंगदुखीवर आहार, व्यायाम आणि औषधे या गोष्टींची गरज असते.

गेल्या काही वर्षांत अंगदुखी आणि थकवा या तक्रारी अनेक लोक अनुभवत आहेत. कोविड काळापासून तर या तक्रारी घेऊन येणाऱयांची संख्या कमालीची वाढली आहे. यामागील मूळ महत्त्वाचा हेतू म्हणजे आपले यकृताचे काम करण्याची क्षमता कमी असणे हे होय. यकृताचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल येऊनसुद्धा यकृताची काम करण्याची क्षमता कमी राहणे हे आवर्जून दिसते आहे. आयुर्वेदाप्रमाणे पचनाच्या विकृतींमध्ये थकवा, आळस, चिडचिड वगैरेंपासून ते नपुंसकता, मृत्यू इथपर्यंत अनेक गोष्टी संभवतात असे स्पष्ट लिहिलेले आहे. आज आपण फक्त थकवा याबद्दल जाणून घेऊया. जास्त शास्त्राrय विवेचन इथे करणे योग्य होणार नाही. त्यामुळे याबद्दल विचार करताना, उपाय ठरवताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो, तो गोष्टी याप्रमाणे….

आहारात पथ्यकर (करावे) अशा गोष्टी
– अंगदुखीवरचे उपाय जाणून घेऊया. कायम कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. अंगदुखी कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे हा आणि फक्त आयुर्वेदाने सांगितलेला आहे. याचा दुहेरी फायदा म्हणजे याने अपचन कमी होते (पचनशक्ती सुधारते), घाम येण्याची प्रक्रिया सुधारते, लघवीलाही साफ व्हायला फायदा होतो.

– सुका मेवा (ड्रायफ्रूट) : हे तर आयुष्यवर्धक अशा वर्गात मोडणारे पदार्थ आहेत. यातील खजूर, मनुका, जर्दाळू, अंजीर, काजू (रोज तीनच खावेत), अक्रोड (रोज एक दोनच खावेत). दिवसभरात यापैकी पदार्थ चावून चघळून खावेत. एकावेळी सर्व गोष्टी एकत्र करून खाल्याने त्रास होऊ शकतो. यासोबत आजकाल सूर्यफूल, कलिंगड वगैरे अनेक गोष्टींच्या बियासुद्धा लोक खातात. ते मात्र टाळावे. त्याने विविध रोग शरीरात तयार होतात.

– लवकर झोपावे आणि लवकर उठावे. अंगदुखी, आळस सर्व कमी होते. पुढे सवय करून घ्यावी म्हणजे आरोग्य लगेच सुधारू लागते.

व्यायाम : नैसर्गिक व्यायाम प्रकार करणे जास्त चांगले, अति व्यायाम किंवा अजिबात व्यायाम न करणे हे अयोग्यच. व्यायमापूर्वी आणि नंतर दीर्घश्वसन करावे. त्यात त्वरित फायदा हवा असेल तर नाकाने लांब हळुवार श्वास घेऊन तोंडाने लांब आणि हळूवारपणे सोडावा. दीर्घ श्वसन केल्याने ही अंगदुखी कमी होते.

– आयुर्वेदात स्वेदन कर्म सांगितले आहे. त्याने शरीर हलके होते असे म्हटले आहे. आजकाल स्टीम आणि सोना बाथ नावाचे प्रकार आहेत. ते स्वेदनाच्या आयुर्वेदात सांगितलेल्या 10 प्रकारांपैकी दोन आहेत. सर्वांगास मालिश केल्यावर हे प्रकार घेतल्याने अंगदुखी उत्तम कमी होते.

– सकाळी उठल्यावर तीन तास मोबाईल हातात घेऊ नये आणि त्यावेळी व्यायाम, इतर कामे वगैरे करावे.

– मालिश केल्याने अंगदुखी अतिशय चांगली कमी होते. आठवडय़ातून एक वेळ किमान सर्वांगास मालिश आवर्जून करावे.

– चहा, कॉफीने कॅफिन वगैरेच्या नादाला लगण्यापेक्षा बडीशेप, धणे, जिरे, ज्येष्ठमध यांचा चहा बनवून तो प्यायची सवय लावली तर उत्तम फायदा होतो. औषधांनी काम करायचे असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यावे.

[email protected]