Lok Sabha Election 2024 : भाजपचा फेकूनामा! म्हणे 3 कोटी घरे देणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात गरीबांसाठी 3 कोटी घरे, मोफत रेशन योजना आणि घराघरापर्यंत पाईपलाईनने गॅस यांसह अनेक मोठय़ा घोषणा करण्यात आल्या, मात्र महागाई आणि बेरोजगारीचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा मतांच्या बेगमीसाठी आणखी एक फेकूनामा प्रसिद्ध केल्याची टीका होत आहे.

जाहीरनाम्यात मोफत रेशनची योजना पुढील पाच वर्षे सुरू राहाणार, 70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ, गरीबांसाठी 3 कोटी घरे, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस अशा मोठय़ा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. याशिवाय मुद्रा योजनेची व्याप्ती 20 लाखांपर्यंत वाढवणार, दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवणार, उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील वर्षांपर्यंत वाढवण्यात येईल, अशा घोषणा जाहीरनाम्याद्वारे करण्यात आल्या आहेत.

महागाई वाढली

महागाई कमी करण्याचा पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू, असे आश्वासन मोदी यांनी 2014 आणि 2019 च्या जाहीरनाम्यात दिले होते; परंतु महागाई कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 5.34 टक्के आहे तर शहरात हाच दर 0.56 टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबरमध्ये ग्रामीण भागातील महागाई 4.34 टक्के होती. फेब्रुवारीमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.66 टक्के होता जो गेल्या महिन्यात 8.3 टक्के होता. म्हणजेच अन्नधान्याच्या किमती वाढतच गेल्या असून त्या गोरगरीबांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत.

बेरोजगारीत तिपटीने वाढ

मोदी सरकारने गेल्या दोन्ही जाहीरनाम्यात मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मेक इन इंडियाचे ढोल बडवले गेले, परंतु प्रत्यक्षात हिंदुस्थानात 83 टक्के बेरोजगार असून मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी तिपटीने वाढल्याचे समोर आले आहे. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते ‘इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024’ या मथळय़ाखालील अहवाल प्रसिद्ध झाला. कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे अर्थचक्र थांबले. परिणामी या काळात बेरोजगारीने कळस गाठला. 2022 मध्ये 10 वी आणि 12 वी पास तसेच पदवीधरांना नोकऱया नसण्याचे प्रमाण हे लिहिता-वाचताही न येणाऱयांच्या तुलनेत अनुक्रमे सहा आणि नऊ पटींनी अधिक आढळून आले.

जनता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही – राहुल गांधी

भाजपच्या जाहीरनाम्यातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द गायब आहेत, याकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. यावेळी तरुण मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत, आता ते काँग्रेसचे हात बळकट करून देशात रोजगार क्रांती आणतील, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून भाजपला आरसा दाखवला आहे.