Lok Sabha Election 2024 : फडणवीसांचा कोट्यधीश फकीर! परभणीतील रासपचे उमेदवार, महादेव जानकरांकडे पाच कोटींची संपत्ती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘फकीर’ अशी उपमा देऊन ज्यांचे कौतुक केले ते महादेव जानकर हे पाच कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. जानकर यांच्या ठिकठिकाणी जमिनी असून, जवळपास 18 एकर जमीन त्यांच्या नावावर असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे.

अजित पवार गटाच्या पदरी आलेली परभणीची जागा देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या शिताफीने महादेव जानकरांच्या गळ्यात घातली. उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी तोंड फाटेस्तोवर महादेव जानकर यांचे कौतुक केले. पाच वर्ष मंत्री राहूनही जानकर यांनी कवडीची कमाई केली नाही. ते फकीर आहेत. त्यांना कुठेही घरदार नाही. ते रेल्वेस्टेशनवरही झोपू शकतात. जानकरांची कुठेही जमीन नाही, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

जानकरांच्या शपथपत्राने फडणवीसांना तोंडावर पाडले
उमेदवारी अर्जासोबत महादेव जानकर यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरण जोडले आहे. या शपथपत्राने देवेंद्र फडणवीस रेटून खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. महादेव जानकर यांच्या नावावर 18 एकर 14 गुंठे शेती आहे आणि त्यांनी आपला व्यवसायही शेती दाखवला आहे. त्यांच्याकडे चल आणि अचल मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे. फकीर माणसाकडे एवढी कोट्यवधींची संपत्ती पाहून परभणीकर अचंबित झाले आहेत.

अशी आहे संपत्ती
महादेव जानकर हे सातारा जिल्ह्यातील पळसवाडी येथील रहिवासी आहेत. 2019 मध्ये जानकरांचे उत्पन्न 26 लाख रुपये होते. चार वर्षांत त्यात 14 लाखांची भर पडली असून, 2023 मध्ये त्यांचे उत्पन्न 40 लाखांच्या पुढे गेले आहे. जानकर यांची चलसंपत्ती 1.25 कोटी रुपये एवढी असून त्यांच्याकडे केवळ 27 हजार रुपये रोख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी 51 लाख रुपयांची एफडी केलेली आहे.

गोल्ड बॉण्ड स्कीममध्ये त्यांची जवळपास 30 लाखांची गुंतवणूक आहे. जानकर यांच्या पीपीएफ खात्यात सव्वादोन लाख रुपये जमा आहेत. जानकरांकडे 200 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने असून, त्याचे मूल्य 13.65 लाख रुपये आहे. महादेव जानकर यांच्याकडे पावणेचार कोटींची अचल संपत्ती आहे. यात शेतजमीन, निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग, रायगड येथे त्यांच्या जमिनी आहेत. सोलापूर आणि जालना येथे अकृषिक जमिनीही आहेत. रायगड, पुणे, नगर आणि मुंबई त्यांच्या निवासी तसेच व्यावसायिक मालमत्ता आहेत.