कॅलरीजचे मोजमाप

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

काही लोकांना सतत कॅलरीज मोजायची सवय असते. त्यासाठी आजकाल ऍपदेखील आहेत. खरं सांगायचे तर कॅलरीपेक्षा अन्न गुणवत्ता आणि निरोगी जीवनशैलीच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करायला हवे.

बहुतेक लोकांना असे शिकवले गेले आहे की, वजन कमी करणे ही साधी गणिताची बाब आहे. कॅलरी कमी करा – विशेषतः आठवडय़ात 3,500 कॅलरीज कमी करा आणि अर्धा किलो वजन गमावाल. परंतु हे दिसते तितके सरळ आणि सोपे नसते. वजन कमी करण्याच्या बाबतीत ‘कॅलरी इन आणि कॅलरी आऊट’ ही कल्पना केवळ पुरातन नाही तर ती चुकीची आहे असेच वाटते.

तुमचे शरीर कॅलरीज कसे वापरेल हे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा प्रकार, तुमच्या शरीरातील चयापचय, तुमचे वय आणि अगदी तुमच्या आतडय़ात राहणाऱया जिवांचा प्रकार यासह अनेक घटकांवर अवलंबून असते.

कॅलरीजपेक्षा आहाराचा दर्जा सुधारण्यावर आणि निरोगी वजन मिळवण्यासाठी शाश्वत जीवनशैलीत सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा. कारण सर्व कॅलरीज समान तयार होत नाहीत. जसे की 100 ग्रॅम मैदा आणि 100 ग्रॅम बाजरी यात सारख्याच कॅलरीज असतात, पण मैद्यापेक्षा बाजरी ही जास्त पोषक आहे. शिवाय त्यात जास्त तंतुमय पदार्थ असल्यामुळे पटकन रक्तातील साखर वाढत नाही.

तुमचे शरीर कॅलरीजवर प्रक्रिया कशी करते?
– आतडे-मायक्रोबायोम : कोटय़वधी जीव तुमच्या आतडय़ात राहतात. संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक मुळात बारीक आहेत त्यांच्या आत जास्त वजन असलेल्या लोकांपेक्षा भिन्न प्रकारचे जिवाणू राहतात. आतडय़ातील काही प्रकारचे जीव इतर प्रकारच्या जिवांपेक्षा काही पदार्थांमधून विघटन करण्यास आणि अधिक कॅलरी वापरण्यास सक्षम असतात.

– आपले चयापचय वेगवेगळे असते. प्रत्येक शरीराचा एक ‘सेट पॉइंट’ असतो जो वजन नियंत्रित करतो. हा सेट पॉइंट तुमची जीन्स, तुमचे वातावरण आणि तुमचे वर्तन यासह अनेक घटक प्रतिबिंबित करतो.

– खाण्याचा प्रकार. तुमच्या खाण्याच्या निवडींचा तुमच्या कॅलरीच्या सेवनावर देखील परिणाम होऊ शकतो. एका अभ्यासात प्रत्येक गटाला सारख्याच कॅलरीजचे जेवण दिले गेले आणि त्यांना हवे तेवढे खाण्याची सूचना देण्यात आली, परंतु जेव्हा सहभागींनी प्रक्रिया केलेले अन्न खाल्ले तेव्हा त्यांनी 500 कॅलरीज खाल्ले.

अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी…
– पहिली गोष्ट अशी की, आहाराच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जेवणाचे नियोजन करताना, प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करा, जे तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात खाण्यास प्रवृत्त करू शकतात. त्याऐवजी संपूर्ण धान्य आणि फळे आणि भाज्यांसह प्रक्रिया न केलेले पदार्थ निवडा.

– नियमितपणे जोमाने व्यायाम करा.
– शांत झोप. झोपेच्या खराब गुणवत्तेमुळे वजन वाढू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या वजनावर हार्मोनशी संबंधित परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होते. म्हणून, आपल्या डॉक्टरांशी झोपेच्या समस्यांचे निराकरण करणे हे प्राधान्य असले पाहिजे.

– तुमची औषधे तपासा. कधीकधी औषधांमुळे वजन वाढते. तुमचे डॉक्टर एक पर्याय लिहून देऊ शकतात, ज्याचे समान दुष्परिणाम होत नाहीत.

– तुमच्या तणावाची पातळी कमी करा. कमी झोपेप्रमाणे तणावामुळे वजन वाढू शकते.