सेन्सेक्स 72 हजार पार…, ‘इक्विटी’ पर्यायाचा करा विचार

>>चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

अलीकडेच द मनी नाइन या वैयक्तिक चाचणी करणाऱया संस्थेच्या माध्यमातून गुंतवणूकदाराच्या बचतीच्या सवयीचे मूल्यमापन केले गेले. पाहणीत आढळलेले आकडे अगदी थक्क करणारे होते. हिंदुस्थानी आजही आपला पैसा पारंपरिक पद्धतीने बँक व सोने यामध्ये गुंतवताना दिसत आहेत. बँकेत पैसे ठेवणारे 77 टक्के लोक आहेत, तर सोन्यामध्ये गुंतवणारे 21 टक्के लोक आहेत.

आपल्याला जर संपत्ती निर्माण करायची असेल तर आपल्याला सर्व पैसे बँकेत ठेवून चालणारच नाही. बँकेचे सध्याचे व्याज 5  ते 8 टक्केदरम्यान आहे. त्यावर जर कर इन्कम टॅक्स कापून गेला तर तो दर 3 ते 5 टक्के निव्वळ हातात येतो. याच पद्धतीने जर आपण गुंतवणूक करीत गेलो तर महागाईचा 7 ते 8 टक्के दर पाठी कसा टाकता येईल व श्रीमंत कसे बनता येईल?

शेअर मार्केट अशी एक गुंतवणूक आहे, जेथे मुद्दल कमी होण्याची जोखीम आहे, पण येथे अगदी 10 ते 25 टक्के परतावा मिळण्याच्या शक्यता लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीमध्ये असतात. त्यामुळे सगळेच पैसे बँकेत न ठेवता शेअर मार्केटमध्ये गुंतवणे खूप गरजेचे आहे. परदेशी गुंतवणूकदेखील मोठय़ा प्रमाणात शेअर मार्केटमध्ये येत आहे. या सर्व बाबी जर लक्षात घेतल्या तर शेअर मार्केट न भूतो वाढल्याशिवाय राहणार नाही. मग याचा फायदा जर घ्यायचा असेल तर मग सर्वच पैसे बँकेत ठेवून कसे बरे चालेल?

फायदा दिसतो म्हणून सर्वच पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविणे चुकीचेच आहे. जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून किंवा एकत्रित गुंतवणूक करायची असेल तर सेफ फंडात गुंतवून सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनद्वारा लांब पल्ल्यासाठी गुंतवणूक करता येते.

जर बँकेत आपण आपल्याकडे असलेली 50 टक्के रक्कम 6 टक्के परताव्याप्रमाणे बचत केली व उरलेली 50 टक्के रक्कम 15 टक्के मिळतील हे गृहीत धरून गुंतविली, तर दोघांनी मिळून 10.50 टक्के परतावा दिला असे होईल. म्हणजेच महागाईचा दर पार झाला व जोखिमेचे नियोजन झाले असे दोन्ही फायदे गुंतवणूकदाराला मिळू शकतील.

उद्या सेन्सेक्स नवनवीन उच्चांक गाठत राहील. पण जर आपण पारंपरिक पद्धतीने फक्त पैसा बँकेत ठेवला, तर तो मात्र एका मर्यादेच्या बाहेर वाढणार नाही.