Movie Review – चाळीशीतल्या चोरीची धमाल गोष्ट ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’

>> रश्मी पाटकर – फडके

माणसाच्या आयुष्यात वयाच्या विविध टप्प्यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. जसं, सोळाव्या वर्षी प्रेमाचे वारे वाहू लागणं, अठराव्या वर्षी शिंग फुटणं मग गद्धेपंचविशी येणं आणि मग येणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चाळीशी. ना धड तरुण ना धड प्रौढ अशा ऐन मोक्याच्या वळणावरचं हे ठिकाण काहीसं निरस, कंटाळवाणं ठरवण्यात आलं आहे. अशीच  अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाची काहीशी कथा आहे.

वयाची चाळीशी जवळ आली किंवा उलटली की अनेकांना एक विचित्र मनोवस्थेला सामोरं जावं लागतं. कधीतरी तारुण्यातली गंमत, धाडस खुणावू लागतं तर कधीतरी अचानक येऊ घातलेल्या वृद्धत्वाच्या काळजीने मन कातर होऊ लागतं. मानवी वयाची ही अजब कातर अवस्था नेमकेपणाने मांडण्याचा प्रयत्न अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटातून केलेला आहे.

ही गोष्ट आहे सात जणांची. अभिषेक, राघव उर्फ डॉक्टर, पराग आणि वरुण हे चार पुरुष. तर सुमित्रा, शलाका आणि अदिती या स्त्रिया. यातल्या राघव-सुमित्रा, वरुण- शलाका आणि पराग-अदिती या विवाहित जोड्या आहेत तर अभिषेक हा सडाफटिंग वाटणारा. अनेक वर्षांची मैत्री असलेले हे सगळे चाळीशीच्या आसपासचे आहेत. त्यामुळे आपल्या आयुष्याला रंगत आणण्यासाठी वीकेंडला एखादा बंगला गाठून पार्टी करणं हा त्यांचा आवडता छंद. अशाच एका पार्टीत नाचण्यात मग्न असताना अचानक लाईट जाते आणि आधी चुंबन घेतल्याचा व मग कानाखाली वाजवल्याचा आवाज येतो. झालं.. दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांमध्ये एक तणाव निर्माण होतो. दरम्यान, कुणीतरी त्यांना मेल करून एक ब्लॉग तयार केल्याचं सांगतो. त्यात ज्यांनी कुणी हा प्रकार केला असेल, त्याने ते कबूल करावं अशी अटही ठेवण्यात येते. आठ दिवसांनी या रहस्यावरून पडदा उचलला जाणार असतो. या आठ दिवसांत या सातही जणांच्या नात्यात नेमके काय बदल होतात? वरवर सगळं काही छान वाटणाऱ्या या ग्रुपमध्ये नेमकं काय सुरू असतं आणि चुंबन-थप्पड यांचं रहस्य नेमकं काय असतं, याचा उलगडा होण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

पाहा ट्रेलर –

चित्रपटाची कथा तशी वरवर साधी सोपी वाटली तरी त्याची पटकथा मात्र भन्नाट झाली आहे. मध्यतरांपर्यंत घडणाऱ्या वेगवान घडामोडी आणि त्याला दिलेली चुरचुरीत तितक्याच विचार करायला भाग पाडणाऱ्या संवादांची साथ मिळाल्यामुळे प्रेक्षक त्यात गुंतून पडतो. मध्यंतरानंतर शेवटापर्यंत चित्रपट काही ठिकाणी संथ वाटतो. पण त्यातच त्या चित्रपटाचं खरं मर्म दडलं आहे. पटकथा आणि संवाद यांसाठी विवेक बेळे यांना तसंच दिग्दर्शनासाठी आदित्य इंगळे यांना यासाठी पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील.

अभिनयाबाबत बोलायचं झालं तर खरंतर नव्याने सांगावं असं या सातही कलाकारांमध्ये काहीही नाही. कारण, हे सातही जण अत्यंत तगडे अभिनेते आहेत. अतुल परचुरे (डॉक्टर), आनंद इंगळे (वरुण), सुबोध भावे (पराग) आणि उमेश कामत (अभिषेक) या चौघांनी चाळीशीच्या आसपास असणाऱ्या पुरुषांची व्यथा नेमकेपणाने मांडली आहे. विशेष कौतुक ते आनंद इंगळे यांचं. त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर वरुण या व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. या सगळ्या पुरुष कलाकारांनी चाळीशीत आल्यानंतरचं विशेषतः आयुष्यात वेळच्या वेळी गोष्टी घडल्यानंतर येणारं रिकामपण, जोडीदाराबरोबरचे विविध पातळीवरचे संबंध, निसटत जाणाऱ्या तारुण्यात अडकलेलं मन यांमुळे झालेली कातर अवस्था अत्यंत चोखपणे मांडलं आहे.

महिला कलाकारांमध्ये मधुरा वेलणकर-साटम यांची शलाका भाव खाऊन जाते. अदिती झालेल्या श्रुती मराठे यांनी व्यक्तिरेखेचा निरागसपणा सुंदरपणे साकारला आहे. विशेष कौतुक ते सुमित्रा झालेल्या मुक्ता बर्वे यांचं. अतिशय सशक्त अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुक्ताच्या वाट्याला प्रथमच काहीशी ग्रे शेड असणारी पण अत्यंत रंगतदार व्यक्तिरेखा आली आहे आणि त्यांनी त्यात सिक्सर हाणला आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजूही भक्कम आहे. चित्रपटाला ढोबळ अशी कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने काही प्रेक्षकांना तो आधी समजून घेण्यास विलंब लागू शकतो. चित्रपटातील गाणी आणि सिनेमॅटोग्राफीही उत्तम झाली आहेत.

थोडक्यात काय तर काहीसा दुर्लक्ष झालेला पण मानवी मनाच्या मानसिक आणि भावनिक प्रवासातला चाळीशी हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातले गुंते, अडचणी, आकर्षणं, भीती या सगळ्यांचं एक सुंदर तितकंच विचार करायला भाग पाडणारं चित्रण म्हणून अलिबाबा आणि चाळीशीतले चोर नक्की पाहण्यासारखा आहे.