माझ्यावर अन्याय झाला… केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा; एनडीएला गळती

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटपात नाराज असलेल्या नेत्यांची आणि पक्षांची नाराजी आता उफाळून येत आहे. अब की पार 400 पार असा नारा भाजपचे नेते देत असले तरी प्रत्यक्षात सोबत असलेल्या मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यातच भाजपची दमछाक होत आहे. आता आपल्यावर आणि आपल्या पक्षावर अन्याय झाला असे सांगत एका केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. तसेच एनडीएची साथही सोडली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच एनडीएला गळती लागल्याचे दिसत आहे.

बिहारमध्ये आता नितीश कुमार भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे भाजपने जदयू आणि इतर घटक पक्षांशी चर्चा करत जागावाटप जाहीर केले. मात्र, एनडीएने जाहीर केलेल्या या जागावाटपावर राष्ट्रीय लोक जनशक्तीचे प्रमुख पशुपती पारस यांनी नाराजी व्यक्त करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. मोदी सरकारमध्ये ते खाद्यमंत्री होते. आपण प्रामाणिक राहत मित्रपक्षाची भूमिका निभावली. मात्र, भाजपने माझ्यावर आणि माझ्या पक्षावर अन्याय केल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीएची साथ सोडली आहे.

रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षात दोन गट पडले. पासवान यांचा मुलगा चिराग पासवान आणि पशुपती पारस अशी दोन गटात विभागणी झाली. सध्या पशुपती पारस यांच्या पक्षाचे पाच खासदार आहेत. असे असूनही भाजपने जागावाटपात एकही जागा आमच्या पक्षाला दिलेली नाही. तसेच जागावाटपाबाबत आमच्याशी चर्चाही करण्यात आलेली नाही, असे पारस यांनी म्हटले आहे.

पारस यांचे खासदार असलेल्या जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला देण्यात आल्या असून त्यांच्या पक्षाला बिहारमध्ये पाच जागा मिळाल्या आहेत. भाजपने फायद्यासाठी इतर पक्षांना जवळ करत त्यांना संपवण्याचे काम केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होत आहे. आता भाजपने पारस यांच्याकडे दुर्लक्ष करत चिराग यांना जवळ केले आहे. मात्र, त्यामुळे निवडणुकीआधीच एनडीएला गळती लागली आहे.

पशुपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर ते इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यांनी इंडिया आघाडीकडे 6 जागाांची मागणी केली आहे. आरजेडी पारस यांना तीन जागा देण्यास तयार आहे. त्यामुळे आता पारस काय निर्णय घेतात याकडे बिहारचे लक्ष आहे.