खिळवून ठेवणारा – खुफिया

खुफियाहा हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यातील इंटेलिजन्स एजन्सीज, त्यांची कार्यपद्धती, त्याचा येणाऱया निवडणुकीवर होणारा परिणाम, या दिशेने अनेक प्रकरणांची हाताळणी करत असलेला चित्रपट पाहणं वेगळा अनुभव आहे.

क काळ असा होता की, आपल्या देशामध्ये इंटेलिजन्स एजन्सीच्या कार्यपद्धतीला धरून चित्रपट निर्मिती होत नव्हती, पण काळानुसार आता सर्वच विषय चित्रपटात हाताळले जाउढ लागले आहेत. ‘खुफिया’ हा असाच हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश यांच्यातील इंटेलिजन्स एजन्सीज, त्यांची कार्यपद्धती, त्याचा येणाऱया निवडणुकीवर होणारा संभाव्य परिणाम, या दिशेने अनेक प्रकरणांची हाताळणी करणारा चित्रपट आहे …आणि सर्वांना संदर्भ 1999 च्या कारगील युद्धाचा आहे. संपूर्ण चित्रपटभर जाणीवपूर्वक एक धूसरता ठेवलेली आहे. यात फार व्यक्तिरेखा नाहीत, पण त्या व्यक्तिरेखांच्या भावनांचा संवादांतून प्रभावीपणे उपयोग करून घेण्यात आला आहे.

‘खुफिया’ची नायिका आहे केएम अर्थात कृष्णा मेहरा अर्थात तब्बू. केएम एक हेर आहे आणि तिच्या घरात ती कोणत्या संघटनेकरता काम करते हे माहीत नसतं. कामामुळे तिला तिच्या घरातल्या आनंददायी प्रसंगांना वेळेवर येता येत नाही. तिला 14-15 वर्षांचा मुलगा आहे. तिने नवऱयाबरोबर घटस्फोट घेतलेला आहे, पण दोघांचे नाते जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे आहे.

रवी ज्या एजन्सीसाठी काम करतो त्याच एजन्सीची केएम बास आहे. रवीचे चारूशी लग्न झालेले आहे. तो काही सिक्रेट्स परदेशात पाठवत असल्याचा संशय आल्यामुळे एजन्सी त्याच्या संपूर्ण घरामध्ये कॅमेरे लावून त्याच्या सगळ्या हालचाली टिपते. रवीचे त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे. त्यांना आठ-नऊ वर्षांचा एक मुलगा आहे. रवीची आईदेखील त्यांच्या सोबत राहते. या दोन्ही कुटुंबांमध्ये असलेले भावनिक नाते, जे इतर बॉण्डपटामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, ते इथे दिसते.

रवी ऑफिसला गेल्यानंतर चारू जुन्या गाण्यांवर नृत्य करत घरातील सगळी कामं करत असते. केएम आणि तिचा सहायक तिला पाहात असतात. त्यांचा संशय तिच्यावरही असतो. चारूचे उत्तेजक नृत्य केएमचा असिस्टंट एक पुरुष म्हणून पाहतो तर केएम एक बॉस म्हणून नाही, तर एक स्त्राr म्हणून  पाहत असते. त्या दोघांचेही तिच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. चारूच्या   उत्तेजक हालचाली सुरू झाल्यावर तो असिस्टंट उठून दुसरीकडे निघून जातो. हिंदी स्पाय फिल्मचं हे वेगळेपण दिग्दर्शनातून लक्षात येतं. एकाच विभागात काम करणारी दोन माणसं असं नृत्य आपल्या नोकरीचा भाग म्हणूनही पाहू शकत नाहीत. कारण त्यांच्यावर आपल्या देशाच्या संस्कारांचा पगडा आहे.

कथेच्या सुरुवातीला आपल्या देशाने पाठवलेला ऑक्टोपस नावाचा  हेर बांगलादेशात जातो. तिथे गेल्यानंतर तो हेर मिर्झा नावाच्या धनाढय़ाला ठार करणार असल्याची बातमी लीक होते. मिर्झा त्याच्या वाढदिवसाच्या समारंभात सगळ्यांदेखत त्या महिला हेरच्या गळ्यामध्ये काटेरी चमचा घुसवून ठार करतो. तीच ऑक्टोपस, जिला केएमने तयार केलेले असते. त्या मुलीबरोबर केएमचे प्रेमसंबंध असतात. त्या मुलीची कथा केएम सांगत असताना चित्रपटाची सुरूवात होते.

रवीला त्याच्यावर पाळत ठेवली  जात असल्याचा संशय येतो. तो कॅमेऱयातून निरीक्षण करणाऱया दोघांना उडवतो आणि अमेरिकेला पलायन करतो. त्या धावपळीत चारूला गोळी लागते. तो तिला तसाच सोडून अमेरिकेला जातो. चारूला दवाखान्यात नेलं जातं. ती बरी होते पण तिला मानसिक धक्का बसतो. आधीची चारू आणि नंतरची चारू वामिका गब्बीने सुंदर रंगवली आहे. ती एका ब्रिगेडियरची मुलगी असल्यामुळे तिचे देशप्रेम जागृत आहे. आपल्या नवऱयाने देशविरोधी काम करण्याने ती संतापली आहे. तिच्या घरात केएमचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये केएमच्या हातातलेल्या ब्रेसलेटवरून ती तिचा शोध घेते आणि मला अमेरिकेला पाठवा अशी विनंती करते. आपल्या मुलासाठी चारू अमेरिकेला जाते. रवी आणि त्याची आई याराचे भक्त असल्याने ते यारा जोगियाच्या आश्रमात नक्कीच येणार याची चारूला खात्री असते. अमेरिकेत ती याराजीच्या आश्रमाचा शोध घेते आणि तिथे तिला सासू भेटते. ती सासूला पुन्हा घरात घेण्याची विनंती करते.  याराजीच्या सांगण्यावरून तिचा पुन्हा रवीच्या घरात प्रवेश होतो.  प्रत्यक्षात याराजीसुद्धा केएमला मिळालेले असतात. पुढे रवी आणि त्याच्या कुटुंबावरच मिर्झाला संपवण्याची जबाबदारी येते आणि पुढच्या टप्प्यात काय होते यासाठी चित्रपट पाहायला पाहिजे.

चित्रपटातली धूसरता, उत्कंठा वाढवणारी दृश्यं, कथानक, दिग्दर्शनातून आता पुढे काय होणार याचं कुतूहल वाटत राहतं. कलकत्त्यामधील गल्ल्यांमधून फिरणाऱया मोटरसायकलीचा पाठलाग, वेगाने येणाऱया टेम्पोने उडवणं…. ही दृश्य अंगावर येणारी आहे. जोगिया याराजीच्या गाण्यातून साधुसंतांचे इंटरनाशनल व राजकीय संबंध स्पष्ट होतात. आपणच तयार करून पाठवलेल्या आपल्याच हेराला ठार करण्यात राजकीय व्यक्तींची असलेली मुत्सद्देगिरी, देशासाठी हेराला बळी जावंच लागणार आणि तो बळी जाण्यासाठीच पाठवला होता. विश्वास संपादन करण्यासाठी असं करावं लागतं वगैरे सांगून हेरगिरी म्हणजे मृत्यूला आमंत्रण. कोणतीही विश्वासार्हता नाही. तुम्ही देशासाठी गेलात तरी देशात बदललेल्या परिस्थितीतून तुमचा नाश होऊ शकतो.

या चित्रपटातील संवाद अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या-त्या सिच्युएशनमध्ये अतिशय  परिणामकारक आहेत. अत्यंत कमी शब्दांत केएमच्या मनाची अवस्था आणि केएमचे तिच्या कामावर असणारे आत्यंतिक प्रेम आणि त्याचा तिच्या मनावर होणारा परिणाम खूप काही सांगून जातात.

तब्बू आपल्या मुलाच्या नाटकाला, वाढदिवसाला जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळी ती आपल्या मुलाला खूप महत्त्वाचं काम होतं, अर्जंट काम होतं असं सांगते. हेरगिरीमध्ये काम करणाऱया व्यक्तीचे आयुष्य, त्यांच्या भावनिक जवळीकता, कुटुंबातील संघर्ष या सगळ्यासोबत चारूची कहाणी, केएमची कहाणी, मिर्झाचा खून या सगळ्या गोष्टींमध्ये चित्रपट आपल्याला अडीच तास नक्कीच गुंतून ठेवतो.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)