सामना अग्रलेख – राजभवनातील लुटमार!

‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असा पंतप्रधान मोदींचा नारा होता, पण पंतप्रधानपदापासून राजभवनापर्यंत सगळेच मुक्तपणे चरत आहेत व चरणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. चरणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबले जात आहेत. राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये याचा नमुना म्हणजे भगतसिंह कोश्यारी. संपूर्ण भाजप अशा नमुन्यांनी भरला आहे. असे नमुने भाजपकडे आहेतच, पण बाहेरूनही घेतले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजभवनात लुटमार सुरू होती व त्यात भाजपचा हिस्सा होता, याची नोंद इतिहासात राहील!

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजभवनातील ‘लीला’ हळूहळू बाहेर पडत आहेत. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते व भारतीय जनता पक्षात त्यांनी अनेक पदांवर काम केले, पण घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने किमान नैतिकता पाळायला हवी व आचरण साफ ठेवायला हवे याचे भान कोश्यारी यांना राखता आले नाही व त्यांनी राजभवन हा भाजपचा राजकीय अड्डा बनवला. शिवाय अनेक बेकायदेशीर कृत्ये तेथे चालवली गेली. त्यांना मिळालेल्या 15 कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण आता समोर आले आहे. माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी माजी राज्यपालांचा भ्रष्ट कारनामा उघड केला. राज्यपाल असताना कोश्यारी यांनी उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतींकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या. त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी असून कोश्यारी यांनी 15 कोटी रुपये अंबानींकडून घेतले, पण सामाजिक कार्याच्या नावाखाली घेतलेल्या या देणग्यांचा वापर वेगळ्याच कामासाठी झाला. या पैशांतून त्यांनी पुतण्याला एक आलिशान रिसॉर्ट बांधून दिल्याची माहिती धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या राजभवनात नोटा मोजण्याचे मशीन होते व या नोटा बेकायदेशीर मार्गाने मिळवल्या जात होत्या. राजभवनात या काळात अनेक पुरस्कार वितरण सोहळे पार पडले. यातही अनेक संस्था, उद्योजकांचा सहभाग होता. अनेकांवर अशा सोहळ्यांतून पुरस्कारांचा वर्षाव होत असे. या पुरस्कारांच्या सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात

‘व्यापार’ झाल्याची वदंता

तेव्हा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे अनेक पुढारी त्या काळात राजभवनातच चटया अंथरून बसत. राज्यातील ठाकरे सरकार पाडायचे या कारस्थानाचा ‘अड्डा’ म्हणजे राजभवन. सरकारला पाठिंबा देणाऱया आमदारांना राजभवनात बोलावून त्यांना विविध प्रलोभने दाखवली गेली व त्यात राज्यपाल कोश्यारी सहभागी होते. कोणतीही नैतिकता नसलेले गृहस्थ भाजपने महाराष्ट्राच्या राजभवनात बसवले व त्यांनी सर्व घटनात्मक तरतुदी पायदळी तुडवून काम केले. भाजपने देशभरात हजारो कोटी रुपये राजकीय स्वार्थासाठी गोळा केले. निवडणूक रोखे, पीएम केअर फंड हे त्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, पण राजभवनात बसलेल्या व्यक्तीही मुंबईतून कोट्यवधींची वसुली करत होत्या, हे धक्कादायक आहे. राज्यपाल कोश्यारी यांचे एक पुतणे त्या काळात राजभवनात सर्व व्यवहार पाहत होते. राज्यपालांचा वापर करून त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाकडून लूट केली. या लुटीची नोंद राजभवनात आहे काय? राजभवनाचा वापर कोश्यारी काळात दगडी चाळीप्रमाणे झाला व भाजपचे पुढारी हे सर्व अनैतिक काम उघड्या डोळ्यांनी पाहत होते. भाजपला गैरमार्गाने पैसे जमा करण्याचे व्यसन जडले आहे, पण अशा वसुलीत घटनात्मक पदावरील व्यक्तींना वापरले जाणे हे चुकीचे आहे. उद्योगपती अंबानी यांनी कोश्यारी यांच्या उत्तराखंडमधील संस्थेला 15 कोटींची देणगी दिली त्याबद्दल आक्षेप नाही, पण हे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले नाहीत तर त्या पैशांतून एक आलिशान रिसॉर्ट उभे केले. हा अपराध आहे. पैशांचा

अपहार

आहे. सामाजिक कार्यासाठी मिळालेला पैसा ‘अय्याशी’वर उधळला व त्यात राजभवनाचा गैरवापर झाला. त्याबद्दल महाराष्ट्राचे पोलीस, फडणवीसांचे गृहखाते, ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा काय कारवाई करणार? राज्यपालांना अशा प्रकारे देणग्या स्वीकारण्याचा अधिकार आहे काय? या कोट्यवधींच्या देणग्यांच्या बदल्यात राज्यपालांनी त्या उद्योगपतींना काय ‘फेवर’ केले? यावर प्रकाश पडायला हवा. एका अंबानींचे 15 कोटींचे भांडे फुटले. मुंबई-महाराष्ट्रातील व्यापारी, उद्योगपती, बिल्डर्स यांच्याकडून नेमक्या किती खंडण्या देणगीरूपात उकळल्या गेल्या याचा तपास फडणवीसांच्या गृहखात्याने करायला हवा. मुंबईतून मोठे ‘डबोले’ घेऊन भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला गेले. या डबोल्यातले आणखी कोणी भागीदार किंवा हिस्सेदार आहेत काय? कोश्यारी हे मोदींप्रमाणेच ‘फकीर’ आदमी होते. अशा फकिराला कोट्यवधी रुपये गोळा करण्याची गरज का भासली? ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असा पंतप्रधान मोदींचा नारा होता, पण पंतप्रधानपदापासून राजभवनापर्यंत सगळेच मुक्तपणे चरत आहेत व चरणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आहे. चरणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबले जात आहेत. राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये याचा नमुना म्हणजे भगतसिंह कोश्यारी. संपूर्ण भाजप अशा नमुन्यांनी भरला आहे. असे नमुने भाजपकडे आहेतच, पण बाहेरूनही घेतले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजभवनात लुटमार सुरू होती व त्यात भाजपचा हिस्सा होता, याची नोंद इतिहासात राहील!