शिर्डीतील पार्किंगमध्ये भर दिवसा गोळीबार, दोन संशयितांना अटक

शिर्डीमध्ये गुरुवारी एक भयंकर प्रकार घडला आहे. येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास साई मंदिरापासून जवळच असलेल्या साई लक्ष्मी पार्किंग मध्ये भर दिवसा दोन तरुणांनी गोळीबार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्य़ांना एक दुचाकी व काडतुसाची रिकामी पोंगळी तसेच एक दांडा घटनास्थळी आढळून आला. पोलीासांनी लगेचच आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्किंग मध्ये दोन तरुण दुचाकीवरून आले होते. त्यांची काही तरुणा सोबत जुन्या वादातून बाचाबाची झाली. दोघा तरुणांनी लाकडी दांडा उगारत पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला आणि पार्किंग मधून पळ काढला. पार्किंगच्या लगत असलेल्या हॉटेल गुरुस्थान समोर असलेल्या एका हॉटेलच्या काचेवर ही गोळी लागली मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने लगतच्या लोकांनी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भर दिवसा अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने शिर्डी शहरातील नागरिकांच्य़ा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शिर्डी पोलीसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.