Chamari Athapaththu : चमारी अटापट्टूचे तुफान; दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रचले अनेक विक्रम

एकीकडे आयपीएलमध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी चाहत्यांना पाहायला मिळतेय. वेगवेगळे विक्रम रचले जात आहेत. मात्र दुसरीकडे श्रीलंकेच्या चमारी अटापट्टू या महिला खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या धुव्वाधार फलंदाजीने जगभरातील क्रीडा प्रेमींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. 302 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चमारीने एकटीने खिंड लढवत 195 धावांची स्फोटक खेळी केली आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. या विजायसह चमारीने आणि श्रीलंकेच्या महिला संघाने अनेक विक्रम रचले.

श्रीलंकेच्या महिला संघाने 17 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोमांच विजय मिळवत इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेची एकदिवसीय मालिका सुरू असून तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेटने पराभव केला. विशेष म्हणजे महिला क्रिकेटच्या इतिहासात 300 हून अधिक धावांचे लक्ष यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा बहुमान श्रीलंकेने आपल्या नावावर केला. यापूर्वी कोणत्याच संघाला 300 हून अधिक धावांचे लक्ष्ये गाठता आले नाही.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पाच विकेटच्या मोबदल्यात 301 धावा केल्या आणि श्रीलंकेला 302 धावांचे आव्हान दिले होते. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूलवार्टने 23 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 184 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखता आले नाही. श्रीलंकेची कर्णधार चमारीने सर्व सुत्र आपल्या हातात घेत एकटीने खिंड लढवत 139 चेंडूंत 26 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 195 धावा केल्या. चमारीला निलाक्षिका सिल्वाची चांगली साथ मिळाली आणि दोघींनी मिळून 146 चेंडूंत 179 धावांची नाबाद भागिदारी केली. त्यामुळे श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेटने पराभव करत 302 धावांचे लक्ष यशस्वीरित्या पूर्ण केले.

चमारीच्या या खेळीने अनेक विक्रम मोडीत निघाले. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील चमारीची खेळी तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. या लिस्टमध्ये एमेलिया केर पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. एमेलियाने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद 232 धावा ठोकल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकवर बेलिंडा क्लार्क असून तिने 1997 मध्ये डेनमार्कविरुद्ध नाबाद 229 धावांची खेळी केली होती. या दोघींनंतर तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाच्या दिप्ती शर्माचा समावेश होता. मात्र दिप्तीचा 188 धावांचा विक्रम चमारीने मोडीत काढला आणि चमारी 195 धावांसहित तिसऱ्या क्रमांकावर स्थानबद्ध झाली.

लक्षाचा पाठलाग करताना चमारीने केलेल्या धावा या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत. यापूर्वी 2017 मध्ये लॅनिंगने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 152 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम सुद्धा चमारीने मोडीत काढला.

श्रीलंकेची महिला टीम एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 हून अधिक धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करणारी पहिली टीम बनली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावार होता. ऑस्ट्रेलियाने 2012 साली न्युझीलंडविरुद्ध 289 धावांचे आव्हान पूर्ण केले होते.