घरटे चिऊताईचे! ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’चे उल्लेखनीय काम

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती…’

संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी सर्वार्थाने सार्थ करणारी संस्था म्हणजे ठाणे येथील ‘स्पॅरोताई फाऊंडेशन.’ डॉ. ज्योती परब आणि त्यांचे पती डॉ. राज परब ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’चे संस्थापक असून संस्थेच्या माध्यमातून तसेच व्यक्तिगत स्तरावरही गेली 15 वर्षे चिमणी संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले पाहिजे या उद्देशाने या संस्थेची स्थापना केल्याचे, डॉ. ज्योती यांनी सांगितले.

‘चिमणी हेच आमचे जीवन आहे’ असे सांगणाऱया डॉ. ज्योती या ठाण्यातील ‘संकल्प इंग्लिश स्कूल’च्या संस्थापिका तसेच मुख्याध्यापिका आहेत. निसर्गातून हद्दपार होऊ घातलेल्या चिऊताईच्या संवर्धनाचा प्रवास डॉ. ज्योती यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने सुरू झाला. या अनुभवाविषयी त्या म्हणाल्या, ‘‘15 वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यातील ओवळा या परिसरात राहायला आलो. आम्हाला पक्ष्यांची आवड असल्यामुळे एका मोठय़ा पिंजऱयात आम्ही लव्हबर्ड्स पाळले होते. एके दिवशी आम्ही कार्यालयातून घरी आलो आणि पाहिले तर पिंजऱयात एकही पक्षी नव्हता. माझ्या तीन वर्षांच्या मुलाने पिंजरा उघडून सर्व पक्षी सोडून दिले होते. मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आई, झाडावर मी पक्षी बघितले म्हणून मी सगळय़ांना सोडून दिले.’’ या प्रसंगाने आम्हाला शिकवण दिली ती म्हणजे पक्ष्यांचे जग म्हणजे निसर्ग आहे. तेव्हापासून पक्षी न पाळता घराच्या परिसरात जे पक्षी येतात त्यांच्यासाठी अधिक झाडे लावायची आणि त्यांनाच धान्य, पाणी ठेवायचे असे ठरवले.’’ डॉ. ज्योती यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला आणि प्रचंड प्रतिसादही मिळाला. विविध पक्षी परिसरात येऊ लागले आणि त्यात चिमण्यांची संख्या लक्षणीय होती. यातूनच
‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ची निर्मिती झाली.

गुढीपाडव्यानिमित्त संस्थेतर्फे ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ हा जनसंदेश देणारी आगळीवेगळी गुढी उभारून यात्रा काढली जाते. संस्थेकडून ‘चिमणी संवर्धन दिनदर्शिका’ प्रकाशित केली जाते.
विद्यार्थ्यांच्या मदतीने एका दिवसात 1001 पर्यावरणपूरक घरटी बनविण्याचा विक्रमही संस्थेने केला आहे. चिमणी संवर्धनासाठी चिऊताईचा बंगला, चिऊताईचे पंदील असे आगळेवेगळे उपक्रमही संस्था राबवते.
दरवर्षी जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’तर्फे घेतल्या जाणाऱया उपक्रमात महाराष्ट्रातून लहान मुलांपासून मोठय़ांचाही मोठय़ा प्रमाणावर सहभाग असतो.

मधली सुट्टी
डॉ. ज्योती यांनी त्यांच्या शाळेच्या परिसरातही चिमण्यांसाठी घरटी लावली असून विद्यार्थ्यांसाठी ‘चिऊताईची मधली सुट्टी’ हा उपक्रम घेतला जातो. वर्षातून एकदा सर्व विद्यार्थ्यांना एका छोटय़ा डब्यातून तांदूळ, ज्वारी, बाजरी असे कोणतेही धान्य आणायला सांगितले जाते. पक्ष्यांना हे धान्य, पाणी देण्याची जबाबदारी आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात येते.

जागतिक चिमणी दिनी…
‘स्पॅरोताई फाऊंडेशन’तर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. या वर्षी 16 मार्च या दिवशी ‘मी आणि चिऊताई’ या विषयावर कथाकथन स्पर्धा तसेच हस्तकलेच्या माध्यमातून चिऊताई साकारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनेक शाळा या उपक्रमात सहभागी होणार आहेत. कमी खर्चात घरटे बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.
– अनघा सावंत