वसुंधरा वाचवण्यासाठी कर्ली नदी परिक्रमा

>> स्वप्नील साळसकर

बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप, अफाट वाळू उपसा यामुळे पुराची समस्या वाढत गेली. वसुंधरेला वाचवण्यासाठी वसुंधरा वायंगणकर यांनी नुकतीच सिंधुदुर्गातील सर्वात मोठी कर्ली नदीची परिक्रमा पूर्ण केली. उगम ते संगमापर्यंत पाच दिवस जवळपास 120 किमी चालताना 20 वर्षांपूर्वी पाहिलेल्या पात्राचे बदललेले रूप त्यांना दिसून आले.

मूळच्या वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार गावच्या रहिवाशी सुवर्णा वायंगणकर नोकरीनिमित्ताने मुंबईत वास्तव्य करतात. गडकिल्ले भ्रमंती करतानाच संवर्धनाचे कामही त्या करत आहेत. लहानपणी गावी असताना पाहिलेली आणि आताची कर्ली नदी यात त्यांना जमीन आसमानाचा फरक जाणवला. म्हणूनच त्यांनी सोशल मीडियावरून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मुंबईतून आलेले शैलेश जाधव यांना सोबत घेत त्यांनी वसुंधरा वाचवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

पहिल्या दिवशी कुडाळ तालुक्यातील शिवापूर मनसंतोष गड डोंगराच्या उगमावरून त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली. नदीच्या कडेवरून पाठीवर संसार घेऊन वांगणकर यांनी चालायला सुरुवात केली. प्रचंड झाडीझुडपे वाढल्यामुळे अडथळा निर्माण होता. दोन रात्र त्याच ठिकाणी मुक्काम केल्यानंतर पुढे वसोली दुकानवाडपर्यंतचा प्रवास सुरू झाला.

काही ठिकाणी पाण्यामध्ये खोलाई (काsंड) तयार झाली असल्यामुळे चालता येत नव्हते. अखेर आंबेरी पुलापर्यंत दोघेही पोहोचले. दुपारी स्वतः जेवण तयार करायचे आणि पुढील प्रवास सुरू असायचा. पुढे मग माणगाव साखळी पूल, साळगाव, पिंगुळी पार करत भंगसाळ आणि कर्ली नदीचा संगम पाहत सोनवडे येथे चौथा स्टे घेतला. काही ठिकाणी रस्ता नव्हता. पाचव्या दिवशी मग कवठीपासून चिपी येथे पोहोचल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला आणि नेवाळीपर्यंत चालत
वायंगणकर यांची अखेर परिक्रमा पूर्ण झाली.

निसर्ग संवर्धनाचा संदेश
महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या नववारी साडीच्या पोशाखातूनच 1998 पासून वायंगणकर हे प्रबोधनाचे कार्य करतात. गिरनार परिक्रमाही त्यांनी याचप्रकारे पूर्ण केली. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल दोन वर्षांपूर्वी राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला.