आयपीएल राऊंडअप – अबब..! 16.8 कोटी लोकांनी पाहिला आयपीएलचा पहिला सामना 

आयपीएलमध्ये केवळ धावांचेच विक्रम मोडले जात नाहीत तर दर्शकांचेही नवनवे विक्रमच रचले जात आहेत. आयपीएलचा उद्घाटनीय सामना म्हणजेच चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात खेळला गेलेला हा सामना आयपीएलची अधिकृत ब्रॉडकास्टर डिजनी स्टारवर 16.8 कोटी दर्शकांनी पाहून एक नवा विश्वविक्रमच रचला आहे. याआधी कोणत्याही सामन्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतकी मोठी दर्शक संख्या लाभली नव्हती. तसेच एकाचवेळी 6.1 कोटी दर्शक सामना पाहत असल्याचाही विक्रम या सामन्यात रचला गेला. या विक्रमाबाबत ‘स्टार स्पोर्ट्स’ने माहिती देताना सांगितले की येत्या सामन्यात यापेक्षा चांगले प्रक्षेपण करत आम्ही दर्शकांचा आकडा आणखी मोठया उंचीवर नेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या आयपीएलमध्ये आधीचे सारे विक्रम मोडीत काढले जातील, असेही ते अभिमानाने म्हणाले.

2 सामन्यात मॅक्सवेलच्या 6 धावा

आपल्या घणाघाती फलंदाजी ओळखला जाणार्या ग्लेन मॅक्सवेलची बॅट अद्याप शांत आहे. गेल्या दोन्ही सामन्यात फलंदाजीला येऊनही तो केवळ सहा धावाच करू शकला आहे. त्याच्या षटकार-चौकारांची जशी क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे तशीच वाट प्रशिक्षक नील मॅपेंझीही पाहतोय. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलची बॅट आपल्या दोन्ही डावातील अपयश भरून काढेल, असा विश्वास मॅपेंझीने व्यक्त केला आहे. आता केवळ दोनच सामने झाले आहेत. त्याने आतापर्यंत आमच्या संघाला अनेक सामन्यात थरारक विजय मिळवून दिले आहेत. तो तसेच विजय आताही मिळवून देणार. टी-20 क्रिकेटमध्ये आपले नशीब कधीही पलटू शकते. त्यामुळे मॅक्सवेलही आपल्याला फार काळ वाट पाहायला लावणार नाही, असेही मॅपेंझी म्हणाला.

सूर्याची प्रतीक्षा वाढली

मुंबई इंडियन्सच्या सलग दोन पराभवांमुळे क्रिकेटप्रेमी झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सूर्याची प्रतीक्षा आणखी वाढणार असल्याची निराशाजनक माहिती समोर आली आहे. बंगळुरू एनसीएमध्ये फिटनेस सिद्ध करण्यासाठी झगडत असलेल्या सूर्याला आयपीएलच्या मैदानात तळपण्यासाठी आणखी काही सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. जितकी गरज सूर्याची मुंबई इंडियन्सला आहे त्यापेक्षा पैक आवश्यकता हिंदुस्थानी संघाला आहे. येत्या जून महिन्यात टी-20 वर्ल्ड कप असून त्या स्पर्धेसाठी सूर्याचे फिट राहणे गरजेचे आहे. त्यामुळे बीसीसीआय सूर्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. परिणामतः सूर्याला फिट व्हायला जितका वेळ लागेल तितका लागू दे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे सध्या नवव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला आपल्या संघात खेळत असलेल्या खेळाडूंच्या जिवावरच गुणतालिकेतील स्थान वर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.