सूर-ताल – आम्ही चालवू हा पुढे वारसा…

>>गणेश आचवल

संगीत वारसा जपणाऱया कुटुंबाचा आलेख अधिकाधिक उंचावत गिटारवादन क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय प्रवास असणारे तुषार पार्टे.

हिंदी चित्रपटसृष्टीत आर डी बर्मनपासून ते संगीतकार विशाल भारद्वाज, जतीन-ललित, आदेश श्रीवास्तव अशा अनेक संगीतकारांच्या चित्रपटातील सुप्रसिद्ध गाण्यांसाठी ज्यांनी गिटारवादन केले आहे ते सुप्रसिद्ध गिटारवादक म्हणजे तुषार पार्टे. त्यांचे कुटुंब मूळ कोल्हापूरचे. त्यांचे आजोबा अनंतराव पार्टे हे पृथ्वी थिएटर्समध्ये होमिओपथी डॉक्टर होते. पृथ्वीराज कपूर यांनी तुषारजींच्या बाबांचे पेटीवादन ऐकले. त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी अनंतरावांना मुंबईत बोलावून घेऊन तुषारजींचे बाबा बाळ पार्टे यांना पृथ्वी थिएटर्समध्ये हार्मोनियम वादक म्हणून घेतले. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाची मुंबईत राहण्याचीदेखील व्यवस्था केली.

तुषारजी म्हणतात, ‘‘संगीत कलेचे संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच झाले. संगीत क्षेत्रातील माझे पहिले गुरू माझे बाबा. त्यानंतर सी एफ लोबो, दिलीप नाईक आणि डी वूड यांच्याकडे मी गिटारचे प्रशिक्षण घेतले. पहिल्यांदा वयाच्या सहाव्या वर्षी ‘इन्ही लोगोने’ या सुप्रसिद्ध गाण्याकरिता मी स्टेज शोमध्ये गिटारवादन केले होते. माझे वडील सुप्रसिद्ध संगीतकार असल्याने या क्षेत्रातील अनेक माणसे मला ओळखत होती. त्यामुळे या क्षेत्रातील प्रवास थोडा सोपा झाला, पण या क्षेत्रात मेहनत करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.’’

तुषार पार्टे यांनी अनेक परदेश दौरेदेखील केले आहेत. पंचमदा आणि आशा भोसले यांच्या कार्यक्रमात अनेक वर्षे त्यांनी इलेक्ट्रिक गिटार वाजवली आहे, तर पंकज उधास यांच्या गायन कार्यक्रमात त्यांनी 12 तारी गिटार वाजवली आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘ओ ओ जाने जाना’, ‘गुमशुदा’, ‘मेरा कुछ सामान’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी त्यांनी गिटारवादन केले आहे. त्यांनी पाश्चिमात्य वाद्येदेखील वाजवली आहेत. ऐश्वर्या बच्चन यांच्यावरती चित्रित झालेल्या ‘ओ बेखबर’ या गाण्यात त्यांनी स्पॅन्डिनेव्हिअन डलसीमर नावाचे तंतुवाद्य वाजवले आहे.

‘स्टुडिओ अनविंड’ नावाचा त्यांचा स्टुडिओ असून तिथे अॅनालॉग म्युझिक निर्मिती केली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार त्यांच्या लोणावळा येथे असलेल्या स्टुडिओत येत असतात. कॅलिफोर्निया इथे राहणाऱया देवांग गौड या गायकाच्या अल्बमसाठी तुषारजी आणि त्यांचा मुलगा जय यांनी संगीत संयोजन केले आहे. हा अल्बम अॅनालॉग म्युझिक निर्मिती करत आहे. तुषारजी हे पंचम स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ते म्हणतात, ‘‘आता माझा मुलगा जय हादेखील या क्षेत्रात आहे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबांनी हा संगीत वारसा जपलेला आहे.’’

1979 सालापासून आजपर्यंतचा गिटारवादन क्षेत्रातील तुषारजींचा हा प्रवास अतिशय उल्लेखनीय आहे.