रंगपट – पंचनायिकांच्या ‘वारी’सोबत..!

>>राज चिंचणकर

नाटकाच्या प्रवाहात एकजीव झालेले टप्पे अधोरेखित करत आहेत ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका हर्षदा बोरकर…

‘वारी’ ठरवली तरी एकटय़ाने करता येत नाही. ‘वारी’प्रमाणेच नाटकाबद्दलही असेच म्हणता येईल. नाटक आणि वारी या दोन्ही समूहाने करायच्या गोष्टी आहेत. मग ज्यात ‘वारी’च आहे, ते ‘जन्मवारी’ नाटक तरी याला अपवाद कसे ठरेल? याच ‘जन्मवारी’चा संच जुळवताना ‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया’ या अनुभवाचा मला साक्षात्कार होत गेला.

पाच नायिकांमध्ये उभे केलेले हे नाटय़! काही वर्षांपूर्वी जेव्हा नाटकाची कच्ची संहिता माझी सच्ची मैत्रीण व अनुभवी रंगकर्मी संपदा जोगळेकर-कुळकर्णी हिला वाचून दाखवली, तेव्हा उत्स्फूर्तपणे ती म्हणाली, ‘‘यातली मंजिरीची भूमिका मला करायला आवडेल.’’ त्यावेळी अत्यंत अविश्वासाने मी तिच्याकडे पाहिले आणि तिला संहिता आवडल्याची ही पावती आहे एवढेच मानले. काही वर्षांनंतर घरातल्या मंडळींसमोर ‘जन्मवारी’ची संहिता वाचली तेव्हा संपदाची लेक शर्वरी जी आता माझी सून झालीय ती म्हणाली, ‘‘आई, हे करू या.’’ संपदाचाही होकार आला. सात्त्विकता आणि बुद्धिमत्तेला व्यक्तिमत्त्वात हलकेच लपवून अशिक्षित, धसमुसळय़ा, भोळय़ा, पण बिनधास्त ‘मंजिरी’नामक वेश्येची भूमिका संपदा स्वतःत भिनवू लागली आणि ‘जन्मवारी’ची पालखी झाली.

नाटकात एक समांतर भूमिका होती ती पंधराव्या शतकातल्या संत कान्होपात्रेची. देखणी, नृत्य-गायन निपुण अशी ही कन्या. शर्वरीमध्ये हे सर्व असल्याने ‘तुज आहे तुजपाशी’ अशीच माझी अवस्था झाली आणि ‘कान्होपात्रा’ निश्चित झाली. माझ्या देवभोळय़ा कीर्तनकार आजीने माझे नाव ‘कान्होपात्रा’ ठेवले होते. तिला कदाचित माझ्यात कान्होपात्रा दिसली असावी. पण आता कान्होपात्रेच्या भूमिकेत समरसून अभंग गाणाऱया शर्वरीला पाहताना मला तिच्यात माझी आजी दिसते.

आमच्या ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) या संस्थेत नव्याने सभासद झालेली गायिका कविता जोशी हिचा एकांकिकेतला अभिनय पाहून ‘‘आपण एकत्र काम करू या’’ असे मी तिला एकदा म्हटले होते. तिच्या रूपाने शांत, विवेकी, संयत अशी ‘जन्मवारी’तली ‘वृंदा’ मला मिळाली. नाटकातले हे माझे आवडते पात्र आहे. कमी, पण मार्मिक बोलणारे आणि नेमक्या प्रश्नांनी समोरच्याला विचारात पाडणारे.

‘विठा’ हे कान्होपात्रेच्या चरित्रातले खरे तर काल्पनिक पात्र, पण ते आपणहून मला भेटायला आले आणि आमचे नातेच जुळले. ही कलाकार म्हणजे शुभांगी भुजबळ. भेटताच क्षणी मिठी मारत ती मला म्हणाली, ‘‘वंचितांच्या रंगमंचासाठी काम करणाऱया तुला भेटण्याची प्रचंड इच्छा होती.’’ प्रश्न नव्हतेच तिचे, फक्त प्रतिक्रियांचे उद्गार आणि त्यापेक्षा तिचा बोलका, निर्मळ चेहरा. मग मिळालीच मला माझी ‘विठा.’ शुभांगीला पात्रयोजनेच्या मागचा विचार समजावला आणि मग तिने कल्पनेतले पात्र कल्पनेच्या पलीकडे जिवंत केले.

वेगवेगळय़ा एकांकिका व नाटकांतून आपली छाप पाडणारी अमृता मोडक ही देखणी, मेहनती अभिनेत्री मला आमच्या ‘टॅग’मध्येच भेटली. देखण्या चेहऱयाचा व उत्तम आवाजाचा चाणाक्षपणे वापर करून दर्जेदार अभिनय करणाऱया हुशार कलाकारांपैकी एक अशी ही अमृता. ठसकेबाज, स्वार्थी आणि शृंगारिक गणिका असे ‘शामा’ हे पात्र अमृताने मोठय़ा थाटात रंगवले. आपली वैशिष्टय़े हुकमी कशी वापरावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे कान्होपात्रेची आई, म्हणजेच शामा नायकीण साकारणारी अमृता मोडक.

कुठल्याच अर्थी ‘संपदा’शिवाय ‘जन्मवारी’ अशक्य होती. पण 25 प्रयोगांचे वचन सर्वार्थाने पूर्ण केल्यावर आता ‘मंजिरी’ कोण करू शकेल याचे उत्तरही संपदानेच विश्वासपूर्वक दिले आणि ते म्हणजे हेमांगी कवी. बोलके डोळे, सरसर बदलणारा मुद्राभिनय, लवचिक देहयष्टी व आवाजाचा हुकमी वापर या बळावर विविध शैलीच्या भूमिका रंगवत परिपक्व झालेली एकपाठी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. एकदा प्रेक्षक म्हणून नाटकाला आलेली हेमांगी नाटकाबद्दल भरभरून बोलली होती. त्यानंतर ही भूमिका स्वीकारणार का? असे तिला विचारल्यावर तिने पुन्हा दोन वेळा प्रयोग पाहिला आणि समरसून तालीम करून अवघ्या काही दिवसांत हेमांगी व तिच्यातली मंजिरी ‘जन्मवारी’च्या प्रवाहात सामील झाल्या. अशी ही माझी ‘जन्मवारी’ची ‘नायिका कहाणी’ पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण आहे. वारीत अनेक जण एका ध्येयाने एकत्र प्रवाहित होत राहतात आणि त्यासोबत परंपरा, संस्कृती व श्रद्धा प्रवाहित करत राहतात याची ही अनुभूती.