विचारा तर खरं…

>>उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

पेमेंट बँका आणि व्यापारी बँका यांमध्ये काय फरक आहे? डीआयजीसीकडून मिळणारे विमा संरक्षण या बँकांतील ठेवींना आहे का?

निनाद पाटणकर, पुणे

उत्तर पेमेंट बँका अन्य व्यापारी बँकांच्या तुलनेत आकारमान, कामाची पद्धत आणि देऊ करीत असलेल्या सेवा यामुळे वेगळय़ा आहेत. नचिकेत मोर समितीच्या शिफारशींचा आधार घेऊन सन 2015 ला रिजर्व बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट कलम 22 अनुसार त्यांना सर्वप्रथम परवाना दिला. त्या इतर कोणत्याही बँकेसारख्या असल्या तरी कोणतीही पतजोखीम घेत नाहीत. बहुतेक सर्व बँकिंग ऑपरेशन त्या करू शकतात, पण कर्ज देऊ शकत नाहीत. क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाहीत. मर्यादित रकमेच्या ठेवी स्वीकारू शकतात. स्थलांतरित कामगार, कमी उत्पन्न असणारी कुटुंबे, छोटे उद्योजक यांची आर्थिक समावेशकता वाढवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. अन्य बँकांना डीआयजीसीकडून उपलब्ध असलेले ठेव विमा संरक्षण या सर्व पेमेंट बँकांनाही उपलब्ध आहे.

खासगी कंपन्यांच्या मुदत ठेवी आणि कर्जरोखे यात गुंतवणूक करावी का?

आनंद साळगावकर, बोरिवली

उत्तर ः मुदत ठेवी या असुरक्षित ठेवी आहेत. कर्जरोखे तारणरहित आणि तारणविरहित दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहेत. जोपर्यंत व्याज, मुद्दल नियमितपणे मिळेल तोपर्यंत काही अडचण येत नाही. जर त्यावरील व्याज नियमितपणे मिळाले नाही अथवा त्यांची मुद्दल मुदतीपूर्तीच्या वेळेस मिळाली नाही तर ते मिळवण्यासाठी सोपा आणि खात्रीशीर मार्ग उपलब्ध नसल्याने यात असलेली जोखीम लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.

सध्या बाजारात अनेक बँका आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देत आहेत. या ठेवी पाच लाख रुपयांच्या मर्यादेत सुरक्षित आहेत. तेव्हा एखादा टक्का जास्त व्याज मिळवण्यासाठी किती धोका पत्करायचा ते ठरवूनच अशी गुंतवणूक करावी. मानांकन संस्थांनी  देऊ केलेल्या कंपनीच्या कर्ज मानांकनाचा (क्रेडिट रेटिंग) संदर्भ म्हणून उपयोग करता येईल.

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या मेलवर पाठवा.