रिटायर्ड

>>सुहास मळेकर

महिन्याभरापूर्वीच आम्ही मित्रांनी मिळून साठावा वाढदिवस साजरा केलेला एक मित्र आज आयसीयूत होता म्हणून त्याला बघायला गेलो. सोबत मेडिक्लेम एजंट होता.

काही दिवस आधी त्याला पाहिलेला आणि आता त्याला पाहताना खूप फरक जाणवत होता. मोठय़ा धकाधकीतून बराचसा गोंधळ माजवून तो आता स्थिर झालेला होता. दहा-बारा दिवस दोन मुले आणि पत्नी प्रचंड तणावाखालून गेलेले, आता त्याच्यासह सगळे स्वस्थ झाले होते.

या मधल्या काळात छाती-पोटात, हातापायात, डोक्यात अतिशय वेदनादायी कळा येत असल्यामुळे तो बेचैन झाला होता. छातीत दुखत होते. शेवटी हार्टची विशेष काळजी घ्यायला हवी म्हणून त्यावर डॉक्टरांनी लक्ष पेंद्रित करून हार्टच्या चार वेगवेगळय़ा चाचण्या करून घेतल्या आणि सगळे नॉर्मल आहे कळल्यावर शेवटी ‘हायपर टेन्शन’ निर्णयावर गाडी येऊन स्थिरावली.

‘‘तुम्ही खूप टेन्शन घेतलेय कसले तरी.’’ आवश्यक त्या चाचण्या होऊन सर्व रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांनी योग्य निदान सांगितले.

आता पेशंटच्या पत्नीला विश्वासाने बाजूला घेऊन डॉक्टरांनी विचारपूस चालू केली. ‘‘घरात त्यांचे कुणाशी काही भांडण-वाद वगैरे झाले आहेत का?’’ डॉक्टरांनी पत्नीला विचारले.
‘‘छे, अजिबात नाही हो.’’ पत्नी म्हणाली.
‘‘ऑफिसात कामाचा ताण?’’
‘‘नाही, आता एक-दीड महिन्यापूर्वीच निवृत्त झाले आहेत ते. म्हणजे खरे तर आर्थिक, शारीरिक, मानसिकतेनुसार एकदम स्वस्थ आहेत. काय झाले डॉक्टर, काही सिरीयस आहे का?’’ पत्नीने अगतिक होऊन विचारले.
‘‘हा निवृत्तीचा काळ पुरुषांसाठी कसोटीचा काळ असतो, अगदी स्त्रियांच्या रजोनिवृत्तीसारखा. सगळय़ाच पुरुषांसाठी म्हणत नाही, पण बहुतांशी नोकरदार या अवस्थेतून जात असतात. इतकी वर्षे काम केल्यानंतर अचानक त्यांना वाटू लागते, ‘माझा आता यापुढे काहीच उपयोग नाही.’ मिळालेल्या मोकळय़ा वेळेचा मनासारखे आयुष्य जगण्यासाठी उपयोग करायला हवा हे खरे आहे, पण सगळय़ांनाच जमत नाही ते. ‘एकतर मी आता संपलो’ असे वाटत असतानाच अवतीभवतीही तसे अनुभव येऊ लागतात.

‘तू तर आता रिकामटेकडा आहेस.’ म्हणून मित्र, शेजारी, नातेवाईक, परिचयातील सर्व त्यांना निवृत्त झाल्याची सारखी जाणीव करून देत असतात. नाहीतर ‘आपण आता एकाकी पडलोय’ अशी सल कायम मनात घेऊन एखादा वावरत राहतो. कुटुंबासाठी पैसे कमवून ठेवून असे पुरुष नंतर अडगळीत पडल्यासारखे स्वतःला निष्काम-निष्क्रिय समजू लागतात.
आयुष्याच्या या वयाच्या टप्प्यावर माणसाने स्वकर्तृत्वाने पद आणि प्रतिष्ठा खूप कमावलेली असते, पण अपवादाने कार्यालयापुरतीच ती मर्यादित असते. लोक त्या पदाला-खुर्चीला सलाम करत असतात आणि अचानक निवृत्तीचा काळ येतो.
ठीक आहे, तसेच असेल असे काही सांगता येत नाही, पण तुम्ही आणि मुलांनी याप्रमाणे त्यांची काळजी घ्या. मी त्यांच्यासाठी एका मानसोपचार तज्ञ मित्राची भेट घालून देतो. सर्व काही ठीक होईल.’’

‘‘खरं आहे. या वयाच्या जवळपास बहुतेकांना असा त्रास होत असतो. मी अशा बऱयाच ग्राहकांना मदत केली आहे.’’ मेडिक्लेम एजंट मित्राने त्याला आलेल्या अनुभवातून पुष्टी जोडली आणि किमान एका जिवाचे पुढील आयुष्य चांगले मार्गी लागले.