चेंबूरमध्ये भीषण आग, 9 जण जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक

चेंबूरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घरगुती गॅस गळतीमुळे सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग लागली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिली.

चेंबूर पूर्व जैन मंदिरासमोरील सिद्धार्थ कॉलनीतील घरात गॅस गळतीमुळे गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता भीषण आग लागली. मध्यरात्रीची वेळ असल्याने कॉलनीतील रहिवासी झोपेत होते. काही वेळातच आग वाऱयासारखी पसरली आणि कॉलनीत घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. यात गायकवाड कुटुंबातील 6 जणांसह एकूण 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी, गोवंडी शताब्दी, शीव रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.