Vote From Home सुविधेत मतांशी छेडछाड होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाला पत्र

लोकसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत घरून मतदान करण्याची सोय देण्यात आली असून त्यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. या सुविधेचा गैरफायदा घेऊन मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं पत्र निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलं आहे.

हे पत्र केरळचे ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी लिहिलं असून त्यावर ठोस उपाय करण्याची मागणीही त्या पत्रात केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय कौल यांना बुधवारी हे पत्र सतीशन यांनी पाठवलं आहे. त्यात ते लिहितात की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना तसंच दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तिचा दुरुपयोग करून मतांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे, असं सतीशन यांनी म्हटलं आहे.

ही सुविधा केरळ विधानसभेच्या 2021च्या निवडणुकांमध्येही देण्यात आली होती. त्यावेळी या सुविधेचा खूप मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे अशा प्रकारच्या मतदानासाठी फक्त मतदार ओळखपत्रावर विसंबून न राहता मतदाराच्या वयाची पडताळणी करण्यासाठी आधार कार्डासह अन्य दस्तऐवजही अनिवार्य करण्यात यावेत, अशी सूचनाही सतिशन यांनी केली आहे.