शिंदे गटातील 10-15 आमदार शिवसेनेत परतण्यास उत्सुक!

शिंदे गटातील 10 ते 15 आमदार नाराज असून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. धाराशीव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मी घेऊन येतोय साहेबांचा संदेश’ या अभियानाअंतर्गत राष्ट्रवादीचे युवानेते, आमदार रोहित पवार यांच्या मराठवाडा दौऱयाची सुरुवात आज कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने तुळजापूर येथून करण्यात आली.

पुढे ते म्हणाले की, सध्या राज्यात व देशात राजकीय पातळी अतिशय खालच्या स्तराला गेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे आर्थिक व राजकीय दबाव तंत्राची ताकद मोठी असून, त्या बळावरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड नाराज असून त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र भाजप जनतेचे प्रश्न सोडून अनावश्यक मुद्यांवर चर्चा करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा व महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी संघर्षाचा लढा उभारला आहे. त्यांचा हा संदेश घेऊन आलो आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढायचे म्हणजे लढायचेच असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाने केला असल्याचे ते म्हणाले.