दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षांचा नाराजीनामा; पद सोडले, पक्ष नाही – लवली यांचा खुलासा

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मात्र, आपण फक्त पदाचा राजीनामा दिला आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे लवली यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी, आपसोबतच्या युतीवर आणि काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आणि उदित राज यांच्या वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी नाकारले.

दिल्ली काँग्रेसने एकमताने घेतलेले सर्व निर्णय काँग्रेस महासमितीचे दिल्ली प्रभारी यांनी रोखले असल्यामुळे त्यांना अपंग झाल्यासारखे वाटत आहे, असे लवली यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हर्ष मल्होत्राच्या जागी भाजप लवली यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचा दावा काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी केल्यावर लवली यांनी पत्रकार परिषद घेऊन आज त्याचा इन्कार केला. त्यांनी आप शी आघाडी केल्याबद्दल टीका केली असली तरी, ही आपल्या मित्रपक्षाची अंतर्गत बाब असल्याचे आपने म्हटले आहे.

लवली यांनी 2015 मध्ये दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2017 मध्ये ते भाजपमध्ये सामीलही झाले होते. पण जवळपास नऊ महिन्यांनंतर ते काँग्रेसमध्ये परतले होते.