नाशिकहून चोरून आणलेल्या चारचाकीसह 2 चोरट्यांना अटक, जालन्यातील बदनापूर पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी

नाशिक जिल्ह्यातून चोरट्यांनी चोरून आणलेली तवेरा गाडी जालना जिल्ह्यातील बदनापूर हद्दीतून जात असल्याची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे यांनी सापळा रचला. चोरट्यांनी हळदोला मार्ग भिलपुरीकडे मोर्चा वळविला असता पोलिसांनी पाठलाग करीत आज 7 ऑगस्ट रोजी भटल्या पहाटे चोरट्यांना वाहनांसोबत ताब्यात घेतले.

नाशिक जिल्ह्यातील घोटी येथून तवेरा चारचाकी गाडी क्र.(एमएच-04,एफएफ-5308)रात्री चोरट्यांनी चोरी केली होती.ही गाडी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगरकडे सुसाट वेगाने येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली होती. ही गाडी मुख्य रस्त्याने घेऊन न येता आडवळणाच्या रस्त्याने घेऊन चोरटे निघाले होते. छत्रपती संभाजीनगरकडून ही गाडी जालनाकडे घेऊन चोरटे येत असल्याची माहिती जालना नियंत्रण कक्षातून बदनापूर आणि चंदनझिरा पोलिसांना देण्यात आली होती.सदर माहिती मिळताच बदनापूर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे यांनी
आपली टीम सोबत घेऊन पाठलाग सुरू केला.

बदनापूर पोलिसांना ही गाडी सुसाट वेगाने येताना दिसली. त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी पुढे जालन्याच्या दिशेने ही काढली असता चोरट्यांनी सेलगाव,हलदोला मार्ग भिलपुरीकडे मोर्चा वळविला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करीत हलदोला, भिलपुरी परिसरात चोरट्यांना अडवून वाहनासोबत ताब्यात घेतले. पोलिसांच्या दोन्ही वाहनाने मोठ्या शिताफीने या गाडीचा पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. यावेळी चोरट्यांनी गाडीतून उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. या चोरीच्या गाडीतून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांनी नावे अनिल संपत वारे (रा.जाफराबाद, ह.मू.चमन जालना) आणि हर्षद भगवान गंगातिरे (रा. चंदनझिरा, जालना) अशी आहेत. चारचाकी गाडी व चोरटे बदनापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे, विशाल काळे,चालक संग्राम ठाकूर,चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोहेकाँ. जितेंद्र तागवाले, चालक मेजर हिवाळे आदींनी केली आहे.