सासऱ्याने बलात्कार केला म्हणून नवऱ्याने बायकोला आई म्हटले आणि घरातून हाकलून दिले

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका 20 वर्षांच्या गर्भवती महिलेने तिच्या सासऱ्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. नवरा घरी नसताना सासऱ्याने आपल्यावर अत्याचार केला असा आरोप या महिलेने केला आहे. धक्कादायक बाब ही आहे की ही गोष्ट जेव्हा तिने आपल्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्याने तिला घरात ठेवण्यास नकार दिला. ‘मुस्लिम लॉ’चा हवाला देत नवऱ्याने तू आता माझी बायको राहिली नसल्याचे म्हटले आहे. नवऱ्याने बायकोला म्हटले की माझ्या वडिलांचे तुझ्याशी शरीरसंबंध झाल्याने तू आता माझ्या वडिलांची बायको झाली आहे. त्यामुळे आता मी तुझ्यासोबत नवरा म्हणून राहू शकत नाही. यानंतर आपल्याला नवऱ्याने घरातून हाकलून दिलं असं या महिलेचं म्हणणे आहे. पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीच्या आधारे तिच्या सासऱ्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली असून ते पुढील तपास करत आहेत.

घटना नेमकी काय आहे ?

मुझफ्फरनगरमधील काकरौली पोलीस ठाण्यात तबस्सूम नावाची तक्रारदार होती. तक्रारदार ही 20 वर्षांची असून ती गर्भवती आहे. तबस्सूमचं मुसस्सर नावाच्या माणसाशी 19 ऑगस्ट 2022 रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर आपला सासरा म्हणजेच इश्तेखार हा आपल्यावर वाईट नजर ठेवून होता असं तबस्सूमचं म्हणणं आहे.5 जुलै 2023 रोजी मुदस्सर त्याच्या आईला घेऊन एका हकिमाकडे गेला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा उचलत इश्तेखार याने आपल्यावर बलात्कार केला आणि कुठे बोललीस तर ठार मारेन अशी धमकी दिली.

नवरा आणि सासू संध्याकाळी घरी आल्यानंतर तबस्सूमने हा प्रकार नवऱ्याला आणि सासूला सांगितला. यानंतर मुदस्सरने तिला हाकलून दिलं. यावेळी सासूने आणि मुदस्सरने आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप तबस्सूमने केला आहे. बलात्कार आणि त्यानंतर घरातून हाकलून दिल्याने तबस्सूम ही हादरली होती. तबस्सूम तिच्या वडिलांच्या घरी परतली होती. घटनेच्या एक महिना नंतर वडिलांसोबत तिने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.