कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था

>>मंगेश वरवडेकर

संघ सर्वात तगडा होता, माहौल जल्लोषाचा होता. सर्व प्रेक्षक पाठीशी होते आणि सामना घरच्याच मैदानावर होता. जिंकण्यासाठी आणखी वेगळे काही लागतच नाही. तरीही आपण हरलो. विशेष म्हणजे जिंकणारा सामना हरलो आणि टीकाकारांनी बदडल्यामुळे खचलेल्या हरियाणाने बाजी मारली. एका गुणाने आपण हरलो आणि ते जिंकले. फक्त इतपंच शब्द मुखी आले, मेरी कश्ती वहां डुबी, जहा पानी कम था.

70 वी राष्ट्रीय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेकांशी बोलणे झाले. तेव्हा गतविजेत्या हिंदुस्थानी रेल्वे संघाचे माजी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी म्हणाले होते, महाराष्ट्र संघच संभाव्य विजेता आहे. सारा स्टेज सजला आहे. अभी नहीं तो कभी नहीं. लोहा गरम हैं, मार दो हतोडा. त्यांचं हे वाक्य पूर्ण सामन्यागणिक कानात घुमत होते. अभी नहीं तो कभी नहीं, पण हे घडता घडता राहिलं.

महाराष्ट्र संघाच्या निवडीपासून ते उपांत्य फेरी प्रवेशापर्यंत सारेच संपका&त होते. महाराष्ट्र संघ आमच्याच मुळे जिंकतोय, याचं श्रेय घ्यायलाही काही मंडळी नक्कीच पुढे होती. जसं विजयाचं श्रेय असतं तसं पराभवाचं दुखही झेलण्याची ताकद असायला हवी. ती मला महाराष्ट्राच्या संघात दिसली नाही. विजयाच्या चौकारानंतर पाचव्या सामन्यात महाराष्ट्र हरला आणि सारंकाही संपलं.

महाराष्ट्राच्या तोडीचा एकही संघ राष्ट्रीय स्पर्धेत दिसला नाही. तरीही साखळीतील दोन्ही लढती आपण संघर्ष करून जिंकलो. गुजरातनेही आपला घामटा काढला आणि दिल्लीनेही झुंज दिली. असो, साखळीत आपण अव्वल ठरलो. यजमान असल्यामुळे आपल्याला सोप्पा ड्रॉ मिळाला होता. साखळीनंतर बाद फेरीत आपल्या विजयाचा वेग आणखीनच वाढला. आधी विदर्भ आणि नंतर कर्नाटक दोघांवर सहजगत्या मात करत आपण उपांत्य फेरीत पोहोचलो.

होळीच्याच रात्री महाराष्ट्राला आपल्या मागील अपयशाचे दहन करून नवा इतिहास रचण्याची संधी होती. गेल्या दोन्ही स्पर्धांत आपल्या कामगिरीचा आलेख उंचावणारा होता. आधी कास्य, मग गेल्या वेळी रौप्य जिंकत आता आपण सोन्यापर्यंत पोहोचणार होतो. अशीच स्वप्नं आपण रंगवली होती. तेच स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने अस्लम इनामदारने पाऊलही टाकले.

उपांत्य फेरीचा पहिला डाव आपला होता. 23-13 अशी दहा गुणांची आघाडी म्हणजे विजयी जल्लोषच. नगरमध्ये सामन्याच्या निकालाआधीच विजयाची तयारी करण्यात आली होती. चढाईवीरांनी विजयाचा पाया रचला होता, केवळ कळस चढवायचा बाकी होता. पण दुसऱया डावात जे काही घडत होतं ते पाहवलं नाही. अचानक आपल्या हुशार बचावफळीकडून चूका घडू लागल्या. चढाईपटू आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा बचावफळी गुणांचे बोनस उधळू लागली. दहा गुणांची आघाडी बघता बघता रिकामी झाली. तेव्हा आपल्या धडाकेबाज खेळाडूंना योग्य मार्गदर्शनाची गरज होती, पण त्यांना प्रशिक्षकांकडून अपेक्षित मार्गदर्शन लाभले नाही. पूर्ण 35 मिनिटे सामन्यात असलेला महाराष्ट्र पिछाडीवर पडला.

खचलेल्या हरियाणाला त्यांच्या प्रशिक्षकांनी वेगवेगळे तंत्र वापरत सामन्यात आणले, पण आमचे बापू वेगवान कबड्डीचे तंत्र आपल्या खेळाडूंना देऊ शकले नाहीत. संघ घसरत असताना ते रोखण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते. असं होत असेल तर तसं करा. नाहीतर तसं करा, असा दमही त्यांनी दिला नाही आणि खेळाडूंनी जिंकता जिंकता सामना गमावला. हा सामना नक्कीच बचावफळीच्या अपयशामुळे आपण हरलो, पण हे तितपंच आपल्या प्रशिक्षकांचंही अपयश आहे.

लोहा गरम होता, पण आपल्या खेळाडूंनी आपल्याच पायावर हातोडा मारला. आम्हाला आमच्याच कच्च्या रणनितीने लुटले. आपल्याला हरवण्याइतपत हरियाणात नक्कीच दम नव्हता, पण आपण हरलो. याला फक्त दुर्दैव म्हणून चालणार नाही. कबड्डीचा जमाना बदललाय. जमान्याबरोबर चालणं गरजेचे आहे. टी-20 च्या जमान्यात 70-80 च्या दशकातला खेळ चालू शकत नाही. राष्ट्रीय जेतेपद जिंकण्याची आपल्याला सुवर्ण संधी होती, पण पुन्हा त्याची राख झालीय. आपण राख केलीय. आता पराभवाला कुरवाळण्यापेक्षा त्याच्यापासून बोध घ्यायला शिका. चुका होणारच, पण त्या चुका सुधारायला शिका. वशीलेबाजीला आवर घातलं तर कबड्डीत आपणच ‘महाराष्ट्र’ बनू. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे.