कोस्टल रोडच्या 800 प्रकल्पग्रस्तांना पालिकेकडून पन्नास कोटींची भरपाई

>>देवेंद्र भगत

पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबई वेगवान बनली असून या कामातील प्रकल्पग्रस्तांनाही पालिका प्रशासनाने ‘कॅटेगरी’नुसार नुकसानभरपाई दिली आहे. यामध्ये खलाशी, तांडेलापासून मच्छीमार, मच्छीविव्रेत्यांनाही कॅटेगरीनुसार पाच ते वीस लाखांपर्यंत मदत मिळाली आहे. सद्यस्थितीत काम सुरू झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2018 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंतची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तर प्रकल्पाचे पूर्ण काम होऊन प्रकल्प संपूर्ण सेवेत येईपर्यंत म्हणजेच मे 2024 पर्यंत सुमारे दीड वर्षाची शिल्लक नुकसान भरपाईदेखील देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’चे 11 मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक अशा एकूण 10.58 किमीच्या मार्गापैकी वरळी ते मरीन ड्राइव्ह या 9 किमी मार्ग खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पालिकेकडून काम सुरू झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2018 पासून नुकसानभरपाई देण्यात आली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे 86 टक्के काम झाले असून काम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमधील नुकसानभरपाई तसेच शिल्लक दीड वर्षाची नुकसानभरपाई लवकरच देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शिवाय आतापर्यंत मदत मिळाली नसलेल्यांनाही मदत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

अशी मिळाली नुकसानभरपाई

बोटीच्या सिलिंडरनुसार बोटीचे स्वरूप बदलते. यामध्ये सिलिंडरच्या संख्येनुसार बोटीची दूरवर जाण्याची आणि कामाची क्षमता वाढते. यानुसार एक सिलिंडर असलेल्या बोटीला 9 लाख, दोन सिलिंडर 12 लाख, तीन सिलिंडर 14 लाख आणि चार सिलिंडरला 18 लाख अशी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. शिवाय ‘टीआयएसएस’च्या सर्वेक्षणानुसार बोटीचा मालक, बोटीवर काम करणारे खलाशी, तांडेल, हाताने मासे-शिंपल्या निवडणारे, किनाऱयावर जाळीने मच्छिमारी करणारे, मासे विकणारे अशा पॅटेगरीनुसार नुकसानभरपाईचे वितरण करण्यात आले आहे. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेक्षण अहवालानुसार ही मदत निश्चित करण्यात आली आहे.