बुद्धीबळाचा महासंग्राम! मुंबईत आजपासून रंगणार ‘ग्लोबल चेस फेस्टिव्हल’; 16 देशांतील 58 मोहरे भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एक्स्पो हॉलमध्ये १० ते १८ जून दरम्यान ‘३६० वन ग्लोबल चेस फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन चेस स्कूल’तर्फे आयोजित या भव्य आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाचे एकूण बक्षीस ६० लाख रुपये आहे.

या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या ‘मास्टर्स’ (अ श्रेणी) स्पर्धेत १६ देशांतील ५८ आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये १४ ग्रँडमास्टर्स आणि ३४ इंटरनॅशनल मास्टर्सचा समावेश आहे. हिंदुस्थानचाचा राष्ट्रीय चॅम्पियन जीएम इनियान पी. याला अव्वल मानांकन मिळाले आहे. ९-राउंड स्विस लीग फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या मुख्य स्पर्धेसाठी ३५ लाख रुपयांचे बक्षीस असून विजेत्याला ८ लाख रुपये मिळतील. यात भारतासह रशिया, अमेरिका, उझबेकिस्तान अशा देशांचे खेळाडू खेळत आहेत.

मुख्य स्पर्धेसोबतच २३०० पेक्षा कमी रेटिंग असलेल्यांसाठी ‘चॅलेंजर्स’ (२२५ खेळाडू) आणि ११ वर्षे सरासरी वय असलेली ‘ज्युनिअर मास्टर्स’ (१२५ खेळाडू) स्पर्धाही रंगणार आहे. या दोन्ही गटांतील विजेत्यांना थेट २०२७ च्या मास्टर्स स्पर्धेत खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सध्याचे जागतिक विजेते डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंदा याच व्यासपीठावरून पुढे आले असल्याने, या वर्षीच्या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.