
नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर शहरात गुन्हेगारीचा आलेखही वर जात असून दिवसाढवळ्या हत्या, हाणामारी, विनयभंग, चिमुरडीवर अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी संपूर्ण शहरात तब्बल एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ऑगस्ट महिन्यापासून कार्यान्वित केला जाणार असून महत्त्वाचे रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणांवर या कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीत खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, सिडको वसाहतींसह २९ महसुली गावांचा समावेश आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, उभारण्यात येत असलेल्या टोलेजंग इमारती आणि सामान्य नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेता सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेवर कामोठे येथील महापालिका नियंत्रण कक्ष तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींचा माग काढणे अधिक सुलभ होणार आहे.
तत्काळ सूचनाही मिळणार
प्रकल्पात ३६० अंशांमध्ये फिरणारे सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत स्पष्ट प्रतिमा टिपण्याची क्षमता असलेले कॅमेरे बसविण्यात येत आहेत. वादळी वाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून कॅमेऱ्यांसाठी स्वतंत्र मजबूत खांब उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी कॅमेऱ्यांसह स्पीकरचीही व्यवस्था करण्यात येणार असून आपत्कालीन किंवा अनुचित घटना घडल्यास नियंत्रण कक्षातून नागरिकांना तत्काळ सूचना देता येणार आहे.
■ पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मुख्य रस्ते, महत्त्वाचे चौक, सिग्नल, बाजारपेठा, उद्याने, मैदाने तसेच महापालिका हद्दीत प्रवेश आणि बाहेर पडणारे प्रमुख मार्ग येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
महिला, मुली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्प राबविण्यात येत आहे. छेडछाड, चोरी, मारहाण आणि इतर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यास मदत होईल.
मंगेश चितळे, आयुक्त पनवेल महापालिका



























































