Jammu Kashmir – राजौरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला; नियंत्रण रेषेजवळ गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या राजौरी भागात लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान नियंत्रण रेषेजवळ घुसखोर आणि लष्करामध्ये दोन तास जोरदार धुमश्चक्री झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सीमेपलिकडून कोणत्याही चिथावणीशिवाय सकाळी 9.50 च्या सुमारास गोळीबार सुरू झाला. सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या तुकड्यांना संशयास्पद हालचाल दिसताच त्यांनी याला चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोर लपले आहेत का याचा शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरनंतर नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. यापूर्वी केवळ किरकोळ घटना घडल्या होत्या. पाकिस्तानी सैन्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुमारे 14 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुंछ व राजौरी भागातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले.